सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोरेगाव मार्गावर जिल्हा परिषद आहे. या ठिकाणच्या चौकात चार रस्ते एकत्र येतात. कोरेगाव रस्ता चांगला करण्यात आल्याने वाहने भरधाव जातात. पोवई नाक्याकडून जाताना तर वाहनांना वेग अधिक असतो. अशावेळी जिल्हा परिषदेत कामासाठी आलेले नागरिक रस्ता ओलांडत असतात. अशावेळी वाहन भरधाव आल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर गतिरोधक निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
....................................................
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष करून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडले आहेत. माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांतही रुग्ण वाढले आहेत. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गावांचे आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत.
..........................................................
अपुरा पाणीपुरवठा;
सातारकर झाले हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काहींना तर पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागलाय. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
...................................................
रस्त्यावरील व्हॉल्व्हचा धोका कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.
सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व्ह रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे. तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
......................................................
साताऱ्यात प्लास्टिक
पिशवीतून फळे
सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहेत.
.........................................................
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्यासुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
..............................................
भाजीमंडईच्या बाजूला कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील अनेक भाजी मंडईच्या बाजूला कचरा पडलेला असतो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. शहरातील अनेक भागात मंडई आहे. काही ठिकाणी बरेचजण भाजीपाला टाकून जातात. तसेच कचरा पडलेला असतो. हा कचरा वेळेत उचलला नाही, तर परिसरात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची खरी आवश्यकता आहे.
.........................................................