कऱ्हाड : येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात बसथांबा गरजेचा आहे. या परिसरात सद्य:स्थितीत कोल्हापूरकडून येणाऱ्या एसटी तसेच अन्य वाहने सेवा रस्ता तसेच महामार्गाच्या कडेला थांबतात. त्याचबरोबर पुणे तसेच मुंबईकडे जाणारी प्रवासीही वाहनांची वाट पाहत महामार्गालगत उभे असतात.
कऱ्हाडात स्वच्छता
कऱ्हाड : शहरात सध्या पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक रस्ते, दुभाजक, पादचारी मार्गावर अग्निशमन बंबाच्या साह्याने वेळोवेळी औषध फवारणी तसेच पाणी मारून स्वच्छता केली जात आहे. तसेच ज्याठिकाणी कचरा साचतो तो परिसरही पालिकेकडून स्वच्छ केला जात आहे.
नाल्यांची दुरवस्था
कऱ्हाड : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पुलाच्या कामाला गती
कऱ्हाड : येथील कृष्णा नाका ते कृष्णा कॅनॉलदरम्यान होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम गतीने सुरू झाले आहे. हा नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन आहे. अनेक महिन्यांपासून नवीन कृष्णा पुलाचे काम सुरू होते.