कऱ्हाड : येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात बसथांबा गरजेचा आहे. या परिसरात सद्य:स्थितीत कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या एसटी तसेच अन्य वाहने सेवा रस्ता तसेच महामार्गाकडेला थांबतात. त्याचबरोबर पुणे तसेच मुंबईकडे जाणारे प्रवासीही वाहनांची वाट पाहत महामार्गालगत उभे असतात. या परिसरात वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यामुळेच अपघाताचा धोका नेहमी असतो. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात बसथांबा करण्याची मागणी जोर धरत आहे.
सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची मोठी दुरवस्था
कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गटारामधील कचरा पसरतोय उपमार्गावर
कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. कऱ्हाडपासून सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची ठिकठिकाणी अशी दुरवस्था झाली असून त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड अशा ठिकाणी गटारात कचरा साचत आहे.
ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड-पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एसटी थांबा प्रवासी शेड हटविलेले आहेत. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एसटी गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी शेड हटविलेले आहेत, अशा ठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे
उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पाइपलाइनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे. उंडाळे ते तुळसण फाटा दरम्यान मोठमोठ्ठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे वाढली आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीची मागणी होत आहे.