कऱ्हाड : येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावर उद्घाटनानंतर अद्याप पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुलावर रात्री अंधार असतो. रात्रीच्या वेळी अंधारातून नागरिकांना व विद्यार्थ्यांना पुलावरून ये-जा करावी लागत आहे. नव्या पुलावर लवकर दिवे बसविण्यात यावेत, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
मसूर : मसूर ते रेल्वेस्टेशन मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता खचला आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
वृक्षारोपण गरजेचे (फोटो : ०५इन्फो०२)
कुसूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे. या मार्गावर दुभाजकही आहेत. दुभाजकात यापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, सध्या सर्व रोपे गायब झाली असून, दुभाजक भकास बनले आहेत. त्यामुळे शोभेच्या झाडांचे रोपण करणे गरजेचे आहे.
पुलाजवळ खड्डे
कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाड शहरातून बाहेर पडण्यासाठी दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्यात खड्डे असल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावे लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
वाहतूक कोंडी कायम
कऱ्हाड : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. सध्या कोल्हापूर नाक्यासह बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क केली जात असल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. बाजारपेठेमध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. तसेच अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.