नागठाणे : ‘स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते,’ असे उद्गार आयकर विभागाचे निरीक्षक सिद्धेश्वर सुरुडकर यांनी काढले.
नागठाणे, ता. सातारा महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व काॅमर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सुरुडकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असून, वेळीच आपल्यामधील सुप्त गुण ओळखून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व कठोर परिश्रमाच्या जोरावर ध्येय गाठले पाहिजे.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. जे.एस. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याकरिता प्रामाणिकपणे कष्ट करून त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे. तसेच मिळालेल्या यशाचा समाज कल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे.’
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अनेक प्रश्न व शंकांचे निरसन केले. प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. संदीप लोखंडे यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. निकिता जाधव यांनी केले. प्रा.रणधीर शिलेवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ॲानलाइन सहभाग नोंदविला.