फलटण : ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात शनिवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माउलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. तत्पूर्वी नीरा नदीच्या पवित्र पात्रात माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी उपस्थित माउली भक्तांनी ‘माउली-माउलीऽऽऽ’चा जयघोष करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या आवाजाने नीरा नदीचे पात्र दुमदुमले होते.माउलींच्या पालखी सोहळ्यात नीरास्नानाला परंपरागत महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर माउलींचा सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माउलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित असतात.दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या नीरा पुलावरून दत्तघाटावर प्रवेश केला. टाळ-मृदंगाच्या जयघोषाबरोबर माउलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. माउलींच्या स्वागतासाठी रांगोळीबरोबर वाद्यांचा निनाद सुरू होता. पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांना स्नान घातले गेले. यानंतर प्रशासनातर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
वरुणराजाचीही उपस्थिती..परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माउलींच्या पादुकांचे दत्त घाटावर स्नान सुरू होते. याचवेळी वरुणराजाने हजेरी लावत अवघ्या माउली भक्तांना चिंब भिजवले. माउलींबरोबर वारकरी व भक्तांचेही स्नान झाले. सोहळ्याला नवी ऊर्जा मिळाली.