कऱ्हाड : तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असताना शहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी व्यावसायिक तसेच ग्राहकांकडून मास्क वापरण्याबाबत निष्काळजीपणा सुरू असल्याचे दिसते. अनेकजण पोलीस अथवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाहून मास्क नाकावर चढवतात. त्यानंतर त्यांचा मास्क गळ्यात लटकलेला दिसतो.
जोमलिंग यात्रा रद्द
तांबवे : कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पश्चिम सुपने, ता. कऱ्हाड येथील जोमलिंग देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. महाशिवरात्रीदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहील. तसेच धार्मिक पूजा व इतर धार्मिक विधी यात्रा समितीच्या उपस्थितीत पार पाडले जातील. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गतिरोधकाची गरज (०४इन्फो०१)
कऱ्हाड : कऱ्हाड- ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यावेळी नेहमी अपघात होत असतात. याची बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन गतिरोधक बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गटारची दुरवस्था
कऱ्हाड : पालिकेच्या आवारात अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी मंडई परिसरात अनेक ठिकाणी गटारांची दुरवस्था झाली आहे. पाणी तुंबल्याने परिसरात अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मंडईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरांमुळे त्रास
कऱ्हाड : शहरातील बसस्थानक, भाजी मंडई, विजय दिवस चौक परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मंडईमध्ये जनावरांची वर्दळ वाढत आहे. पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.