सातारा : डुकराने पायाला चावा घेतलेल्या सदर बझारमधील बालिकेवर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बाब ताजी असतानाच मागील दोन दिवसांपासून पुन्हा याच परिसरातील लहान मुलांच्या अंगावर डुकरे धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. स्वच्छतेबाबत पालिका आरोग्य विभाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांकडूनही जनावरांवर हल्ला होऊ लागला आहे.
काही दिवसांपूर्वी हुदा कुरेशी (वय ६) ही घरासमोर खेळत असताना एका डुकराने तिच्या पायाचा चावा घेतला. यावेळी बेसावध असलेली हुदा खाली पडली असता डुकराने तिचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. हे पाहून एका महिलेने हुसकावल्याने डुक्कर पळून गेले. मात्र हुदाच्या पायावर चांगलेच दात लागले होते. प्रथमोपचार करून तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्या ठिकाणी तिचा पाय कापावा लागेल, असा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे हुदाचे आई-वडील चिंतेत पडले. त्यानंतर त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हुदाची घटना ताजी असतानाच याच परिसरात पुन्हा लहान मुलांवर डुकरे धावून जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पालकच हातात काठी घेऊन डुकरांना हाकलत आहेत. याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाला काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हुदाला पाहण्यासाठी कोणीच आले नसल्याचे पालकांनी सांगितले.
सदर बझारच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी डुकरांची पैदास वाढली आहे. पालिकेला याबाबत सांगूनही आरोग्य विभाग येथील स्वच्छता करत नसल्याने नागरिकांना सतत विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हुदाच्या पायाला डुकराने घेतलेल्या चाव्यालाही पालिकाच जबाबदार असल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेला ओरबडले...मोकाट डुकराप्रमाणे या ठिकाणी कुत्र्यांची संख्याही वाढली असून, हुदाच्या घटनेनंतर येथील जैनब आजीम कुरेशी या सात वर्षांच्या बालिकेला पिसाळलेल्या कुत्र्याने ओरबडले आहे. जैनबच्या अंगावर नखे उमटली आहेत. यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्री व डुकरांपासून लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने पालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.हल्ल्यातील वासरु वाचवले...येथील केबीपी कॉलेज परिसराच्या पाठीमागील बाजूस एका वासरावर चार-पाच कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामध्ये वासरू जखमी झाले. तर त्याचवेळेस तीन युवक तेथून जात होते. या तिघांनी त्या कुत्र्यांना हुसकावून लावले. त्यामुळे या वासराचे प्राण वाचले. पवन राठोड, आदेश, कृष्णा (संपूर्ण नाव नाही) या युवकांनी पूर्ण एक तास रक्षण केले. त्यानंतर तेथील एका रहिवाशांच्या ताब्यात वासरू दिले.रात्री बारानंतर कुत्र्यांची धास्ती...सदर बजारच्या पूर्व भगात रात्री ये-जा करणाºया नागरिकांच्या अंगावर कुत्र्यांची झुंडच मागे लागते. रात्री याठिकाणी कोणीच एकटे फिरकत नाही तर अनेकवेळा दुचाकी वाहनांच्या मागे कुत्री लागल्याने वाहचालक गाडीवरून पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
डुकराने घेतलेल्या चाव्यात हुदा जखमी झाली आहे. हुदाच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे हुदाच्या उपचाराला झालेला खर्च कुटुंबाला न परवडणारा असल्याने पालिका आरोग्य विभागाने हा खर्च उचलण्याची गरज आहे.- अपसर बेपारी