पाटण : ‘तालुक्याचा परिसर अतिदुर्गम आणि डोंगरी आहे, कोरोना महामारी आणि अतिवृष्टी भूस्सखलन यासारख्या घटनांमुळे येथील जनतेला तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज असताना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजही वैद्यकीय अधिकारी मुक्कामी राहत नाहीत, यापुढे असा हलगर्जीपणा खपवून घेणार घेतला जाणार नाही,’ असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी बैठकीत दिला.
पाटण पंचायत समितीची मासिक सभा सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
आरोग्य विभागाच्या या विषयावर बोलताना सदस्य पंजाबराव देसाई आणि संतोष गिरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर मुक्कामी राहिले पाहिजे, अशी भूमिका घेतली.
तालुक्याला जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांची कामे करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता हलगर्जीपणा करत असून, गावोगावी योजना पोहोचण्यासाठी चांगले काम झाले नाही, तर पाणीपुरवठा योजनांसाठी आलेले पैसे परत जातील, अशी भीती सभापती राजाभाऊ शेलार आणि गटविकास अधिकारी मीना साळुंके यांनी व्यक्त केली. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या शाखा अभियंता यांना नोटिसा दिल्या आहेत.
तालुक्यात येत्या दोन दिवसांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २० हजार पाचशे डोसेस द्यावयाचे आहेत, त्यासाठी नियोजन केले आहे.
चौकट..
३२ केंद्रप्रमुख, ६ विस्तार अधिकारी तर १८७ शिक्षक पदे रिक्त..
तालुक्यात आत्तापर्यंत १ लाख ७० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
तालुक्यातील शिक्षण विभागही रिक्त पदांमुळे रोडावला असून, गटशिक्षणाधिकारी यासह ३२ केंद्रप्रमुख सहा शिक्षण विस्तार अधिकारी आणि १८७ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपाली बोरकर यांनी दिली.