सातारा : अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासह अनेक मागण्यांसाठी साताऱ्यातून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने साताऱ्यात निळा जनसागरच उसळला होता. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. सातारा पालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा राजपथावरून मोती चौक मार्गे राधिका रोड, सातारा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोवई नाक्यावर आला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक जीवन भालेराव यावेळी म्हणाले, ‘हा मोर्चा बहुजनांचे हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठीच मैदानात उतरला आहे. या मोर्चाने अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, मुस्लीम, लिंगायत, ख्रिश्चन आदी बहुजन समाजाने एकत्र येऊन संघटित केले आहे. हा लढा असाच कायम ठेवल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचाच असेल. दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू केले आहेत. ते मिटवून समाजामध्ये सलोखा राखण्याचे काम बहुजन क्रांती मोर्चाने केले आहे. या मोर्चाद्वारे असंघटित समाजाला संघटित केले आहे. अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक झाला पाहिजे, भटके विमुक्तांनाही या कायद्यांतर्गत संरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे, दहशतवादाच्या नावावर अटक करण्यात आलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका झाली पाहिजे,’ अशा मागण्याही भालेराव यांनी यावेळी केल्या.बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अनिल माने, अमोल बनसोडे, तुषार मोतलिंग, सतीश रावखंडे, आयेशा पटणी, तेजस माने, आनंदराव लादे आदी उपस्थित होते. संयोजन समितीचे डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. आम्रपाली गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब ओव्हाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महामानवास अभिवादनसातारा येथे रविवारी आयोजित बहुजन क्रांती मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रारंभ झाला. यावेळी मोर्चातील सहभागी तरुणी व महिलांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बहुजन समाज बांधवांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा सहभाग ‘ना जातीसाठी ना मातीसाठी आपला संघर्ष संविधानासाठी’ अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात होते. कसल्याही प्रकारच्या घोषणा न देता महिलांनी हातातील फलकाद्वारे समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या हातातील सर्व फलक लक्ष वेधून घेत होते.बहुजन क्रांती मोर्चामध्ये लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये लांबलांबून आलेल्या वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. हातात निळा झेंडा घेऊन ‘जय भीम’चा जयघोष केला जात होता. महिलांही मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाल्या होत्या.स्वयंसेवकांची नेमणूक मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा जसा पेहराव होता. तशाच प्रकारच्या स्वयंसेवकांचा पेहराव होता. फक्त डोक्यामध्ये निळी टोपी असल्यामुळे हे स्वयंसेवक असल्याचे दिसून येत होते. अन्यथा वाहतूक शाखेचे पोलिसच आहेत, असा अनेकांना भास होत होता.
अवघा उसळला निळा जनसागर...
By admin | Published: January 15, 2017 11:25 PM