सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील त्रिपुटी खिंडीत नेपाळमधील ट्रकचालकाला कुऱ्हाडीने मारहाण करुन लुटण्यात आले. यामध्ये मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्यात आला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी दीपेंद्र बहादूर पूनमगर (मूळ रा. टिकापूर कैलाली, नेपाळ) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्रिपुटी खिंडीतील एका पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. दीपेंद्र पुनमगर हे ट्रक (एमएच,११, एएल, २६३४) घेऊन चालले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन तिघेजण आले. त्यांनी पुनमगर यांना शिवीगाळ, दमदाटी करुन ट्रक बाजुला घेण्यास सांगितले.त्यानंतर ट्रक थांबवून अनोळखी तिघांनी पुनमगर यांना पैसे मागितले. पण, त्यांनी नकार दिला. त्यामुळे अनोळखीतील एकाने पुनमगर यांचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. तर दुसऱ्याने कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये पुनमगर जखमी झाले आहेत. याप्रकारानंतर पुनमगर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चाैधरी हे तपास करीत आहेत.
Satara: नेपाळच्या ट्रकचालकाला त्रिपुटी खिंडीत मारहाण करून लुटले, तिघांवर गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Published: April 18, 2024 7:11 PM