लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा कोरोनाच्या मगर मिठीत जात असल्याने विविध कारणांनी नागरिकांना टेस्टिंग करणं आवश्यक बनलं. लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जिल्ह्यातील काही लॅबमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. याबाबत दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांपुढे पडला आहे.
कोविड काळात सरकारी यंत्रणेपेक्षा अधिक वेगाने विविध टेस्टचे रिपार्ट मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी खासगीचा पर्याय निवडला. रॅट, आरटीपीआर याचे अहवाल प्राप्त व्हायला जिल्हा रुग्णालयात जेवढा वेळ जातो, त्याहीपेक्षा कितीतरी कमी वेळात खासगीचा अहवाल मिळतो. कोविड काळात उपचार लवकर सुरू होऊन रुग्णाला बरं वाटावं, या उद्देशाने खासगी लॅबचा पर्याय निवडला जातो. कोविडसाठी आवश्यक असलेल्या अन्य चाचण्या केवळ खासगीतच उपलब्ध असल्यामुळेही सध्या खासगीचा तोरा वाढला आहे. लॅब चालकांवर दराबाबत कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे दरात साम्यता नाही.
तपासणी करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तीच असली तरीही शहर आणि उपनगरातील दरांमध्ये मात्र चांगलीच तफावत आढळून येत आहे. सॅम्पल तपासणीसाठी शहरात जावं लागतं, असे कारण देऊन उपनगरांमध्ये प्रत्येक टेस्टमागे जादाचा दर आकारला जात असल्याची तक्रार नागरिकांतून केली जात आहे. कोविड रुग्णांसाठी ‘केएफटी’ अर्थात किडनी फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लॅबमध्ये ही टेस्ट अवघ्या तीनशे रुपयांत केली जाते, तर काहीजण यासाठी नऊशे रुपयांपर्यंतचा दर आकारत आहेत. कमी दराच्या केएफटीमध्ये सिरम, क्रिएटिन, युरिया आणि युरिक अॅसिड याबाबतची टेस्टे केले जाते, तर काही जास्त दर घेणारे लॅब चालक याशिवायही सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आदींच्या तपासणी करून देतात.
एजंट सुसाट... प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट
लॅबचालक आणि डॉक्टर यांचे साटेलोटे पाहायला मिळते. काही प्रतिष्ठित वैद्यकीयतज्ज्ञांनी विशिष्ट लॅबला तपासणी करायला पाठविलेल्या रुग्णाच्या रकमेतून स्वत:चे कमिशन बाजूला काढायला ठेवायला सांगितल्याने दर वाढविला जातो. मात्र, काहींनी कमिशन देण्यापेक्षा रुग्णांना सूट देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. काही लॅबमध्ये दिवसा आणि रात्री असे दोन वेगवेगळे दर असल्याचेही नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोविड काळाशिवायही लॅबमध्ये विविध टेस्ट केल्या जातात. यातील काही टेस्ट या मोजक्याच लॅबमध्ये केल्या जातात. अशा टेस्टसाठी काही ठराविक नगांचे एक किट असते आणि ती ठराविक कालावधीत संपवावी लागतात. यामुळे या कालावधीत न वापरले गेल्यामुळे ती किट खराब होते. त्यामुळेही काही टेस्टचे दर जास्तच असतात. मात्र, ऐंशी टक्के डॉक्टर कमिशन घेतातच, असा दावा लॅब चालकांनी केला आहे.
लॅब तपासणीचे दर निश्चित करावेत
कोविड काळात रॅट आणि आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचे दर प्रशासनाने निश्चित करून दिल्यानंतर त्यात कुठंही गोंधळ आढळत नाही. चुकून कोणी अधिकचे पैसे घेत असेल तर त्याला तातडीने जाब विचारला जात आहे. अन्य चाचण्यांच्या बाबतही शासनाने पुढे होऊन दर निश्चित केले तर रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट थांबेल, असा विश्वास नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
कोट :
कोविडमुळे आरोग्य यंत्रणेवर भरपूर ताण आहे. साताऱ्यात तपासणीचे सॅम्पल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ते पुणे, मुंबई, बंगळुरू आदी ठिकाणी पाठवलं जातं. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक प्रकारे दरवाढ झाली आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर दिसतो. त्याबरोबरच टेस्ट करण्यासाठी किटबरोबरच तपासणी करणाऱ्या मशीनमुळेही दरांमध्ये तफावत आढळते.
- डॉ. अनिरूध्द जगताप, सातारा
चाचण्या आणि दर
चाचणी लॅब १ लॅब २ लॅब ३
अॅन्टिजन ४५० ३५० ३५०
आरटीपीसीआर १००० ९०० १०००
सीबीसी २०० २०० २००
सीआरपी ५०० ४५० ५००
डी-डायमर १३०० १५०० ११००
एलएफटी ७०० ६०० ६५०
केएफटी ८५० ७०० १०००
...........