महाबळेश्वर : ज्या कोरोना रुग्णांची घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही, अशा रुग्णांसाठी पालिकेच्यावतीने विलिगीकरण कक्ष सुरू केल्याची माहिती निव्वळ प्रसिद्धीसाठी नगराध्यक्षांनी केलेला राजकीय स्टंट आहे, अशाप्रकारे कोणताही कक्ष पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला नाही, अशा शब्दात उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी नगराध्यक्षांनी शनिवारी केलेल्या विलगीकरण कक्षाच्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण करून, नगराध्यक्षांनी केलेल्या घोषणेतील हवा काढली.
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्यावतीने नाममात्र शुल्क आकारून विलगीकरण कक्ष सुरू केला आहे, असे स्पष्ट करून या विलगीकरण कक्षात नागरिकांनी प्रवेश घेऊन पालिकेने उपलब्ध केलेल्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन नागरिकांना केले होते. यासंदर्भात उपनगराध्यक्ष अफजल सुतार म्हणाले की, आज काही वर्तमानपत्रांत पालिकेच्यावतीने विलगीकरण कक्षाची सुरुवात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली व या विलगीकरण कक्षाची माहिती विचारली. पालिकेचा हा कक्ष कोठे आणि केव्हापासून सुरू करण्यात आला, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना विचारली, तेव्हा त्यांनी अशाप्रकारे पालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारचा विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला नाही. नगराध्यक्षांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाशी पालिकेचा काहीही संबंध नाही. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे, का नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त खरे आहे, असा प्रश्न उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी उपस्थित केला. मुख्याधिकारी या शासनाच्या प्रतिनिधी आहेत, त्यामुळे ते जी माहिती देतील ती अधिकृत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी दिलेले वृत्त खोटे व निव्वल प्रसिद्धीसाठी केलेला राजकीय स्टंट आहे. नगराध्यक्षांनी आजवर केलेल्या अनेक खोट्या घोषणांपैकीच ही एक घोषणा आहे. त्यांची विश्वासार्हता आता राहिलेली नाही. फसवी घोषणा करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु आता अशा फसव्या घोषणेला नागरिक फसणार नाहीत, हे नगराध्यक्षांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी लगावला.
यावेळी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील व तौफिक पटवेकर हे उपस्थित होते.