लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/काशीळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने महामार्गावर एकच थरार निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार, कंटेनर व त्यामधील २५ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा बर्निंग थरार झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून रात्री कार (एमएच ०२ एजी ९५९८) कोल्हापूरकडे निघाली होती. या कारमध्ये चालकासह एक दाम्पत्य आणि एक लहान मुलगा होता. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही कार भरतगाववाडी येथे आली असता पुढे चाललेल्या कंटेनरच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकली. कार कंटेनरमध्ये तशीच अडकली. याच स्थितीत ही दोन्ही वाहने सुमारे चारशे फूट पुढे फरफटत गेली. चालकाने घटनास्थळावरून पलायन केले . ग्रामस्थांनी कारमधील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अग्निशामक घटनास्थळी दाखल होईपर्यंत सर्वच वाहने जळून खाक झाली होती.अन् युवकाने चालविला कंटेनर !कार कंटेनरखाली अडकल्याने कंटेनरमध्ये असणाऱ्या नव्या कोऱ्या दुचाकींनाही झळ बसू लागली. संभाजी चव्हाण, सुनील शेडगे यांनी युवकांच्या मदतीने कोल्हापूर बाजूकडील महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली. बोरगाव पोलिस व अग्निशामक दलही घटनास्थळी आले.भरतगाववाडी येथील युवक मंगेश रघुनाथ गोडसे हा कंटेनरमध्ये बसला. त्याने कंटेनर त्याच स्थितीत पुढे नेला. मात्र, आगीची झळ आतील दुचाकींनाही बसल्याने दुचाकी जळाल्या.
नवीन २५ दुचाकी जळून खाक
By admin | Published: May 11, 2017 11:15 PM