कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील पोतले - येणके दरम्यान असलेल्या वांग नदीवरील नवीन पुलाची पहिल्याच पावसात पुरामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. पोतले जुने गावठाणला पाण्याने वेढा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पोतले - येणके दरम्यान वांग नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल पहिल्याच पावसातील पुरामुळे पाण्याखाली गेल्याने पुलाचे लोखंडी गज वाहून गेले आहेत तर जुने पोतले गावठाणला पाण्याने वेढा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोयना धरणातील पाणी सोडण्यापूर्वीच येथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठा धोका टळला.
वांग नदीला आलेल्या पुरामुळे नदीशेजारी असलेली पोतलेची स्मशानभूमी, लिंगायत समाजाच्या दफनभूमीची संरक्षक भिंत कोसळून जमीन वाहून गेली आहे. तर पाणी पुरवठा योजना पाण्याखाली गेल्याने गावचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गावाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्त्यासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.