सातारा : अवघ्या ३५ विद्यार्थ्यांसह दि. ६ डिसेंबर १८९९ रोजी प्रा. सी. ग. देवधर यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू झाले. या शाळेत सध्याच्या स्थितीत येथे सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कलागुणांना वाव देत विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात येत आहे. शतकोत्तरातही ज्ञानदानासाठी व्रतस्थ राहिलेली ही दगडी शाळा सातारकरांचा अभिमानच आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ब्रीदवाक्यानुसार चालणारी ही शाळा १९०८ मध्ये उभ्या राहिलेल्या दगडी इमारतीत आजही त्याच कणखरतेने उज्ज्वल राष्ट्रासाठी ज्ञानतेज पसरवित आहे. बॅ. पी. जी. पाटील, कवी गिरीश, ना. ह. आपटे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य देवदत्त दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, वरिष्ठ पोलिस अधिकारी अर्जुन सकुंडे, चिंतामणराव कोल्हटकर, प्रा. श्याम मनोहर, अरुण गोडबोले, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे आदी माजी विद्यार्थ्यांची परंपरा या शाळेला लाभलेली आहे. आज येथे ४१ व्या मुख्याध्यापिका म्हणून हसीना फकीर या कार्यरत आहेत. भक्कम इमारत, प्रशस्त मैदान, स्वच्छ पाणी, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र संगणक कक्ष, निर्मल स्वच्छतागृहे, खेळाचे भरपूर साहित्य, कलादालन, संगीत, साहित्य आणि प्रशिक्षित शिक्षक ही शाळेची जमेची बाजू आहे. तर सुमारे साडेपंधरा हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय शिक्षक व विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवीत आहे. अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये आघाडीवर असणारी ही शाळा यशाची परंपराही जपत आहे. एनएफएलएटी परीक्षेत १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले होते. तर दिल्लीतील कला नाट्यात तृतीय क्रमांक मिळविला होता. लोकनाट्य संघात हृत्विक नावडकर, ॠषिका कदम, तनया फडतरे, आसावरी साबळे, प्रणव भिलारे, अमेय साबळे तर लोकसंगीतात यश नडे, लोकनृत्यात एकांक नलवडे व नावेद मुल्ला आणि दृष्यकलेत रोहन निकम या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या लोकनाट्याचे लेखन व दिग्दर्शन शिक्षक जे. पी. पवार यांनी केले होते. पाठ्यपुस्तक मंडळावर गणित विषय कार्यगट सदस्या म्हणून सुवर्णा देशपांडे यांची निवड झाली आहे. डॉ. संजीव गोखले, अमित कुलकर्णी, आर. जे. पाटील, एन. के.आपटे हे प्रयत्नशील आहेत. मुख्याध्यापिका हसीना फकीर यांच्याबरोबरच उपशालाप्रमुख हेमंत देशपांडे, पर्यवेक्षक छाया वाचासुंदर, दिलीप कांबळे, बाळकृष्ण सकुंडे हे उत्तमरीत्या प्रशासन राबवत आहेत. (प्रतिनिधी)या शाळेचे वैशिष्ट म्हणजे एनसीसी आर्मी (मुले-मुली) आणि एनसीसी नेव्हल युनिट हे आहे. यामध्ये २५० मुलांचा सहभाग आहे. स्वयंशिस्तीबरोबरच सैन्य भरतीसाठीचे शिक्षण येथे दिले जाते. सेकंड आॅफिसर सुधाकर गुरव, कैलास बागल हे त्याचे काम पाहतात. न्यू इंग्लिश स्कूलला शतकाचा वारसा आहे. या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. अनेकांनी नावलौकिक केला आहे. या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. येथील दहावी निकालाचीही परंपरा उज्ज्वल आहे. - हसिना फकीर, मुख्याध्यापिका
साताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल विचारवंतांची खाण
By admin | Published: July 08, 2016 11:14 PM