सातारा : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या प्रसिद्ध केलेल्या आराखड्यावरील हरकती व सूचनासंदर्भात आज महाबळेश्वर तालुक्याची सुनावणी तापोळा येथे पार पडली. यामध्ये या विभागातील शेतकरी अल्पभूधारक असून या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची आरक्षणे टाकू नयेत तसेच आराखड्यात टाकलेली आरक्षणे रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्यावरील हरकती व सूचनासंदर्भात आयोजित सभेत सोमवारी तापोळा येथे नवीन महाबळेश्वर प्रारूप आराखड्याबाबत प्राप्त सूचना, हरकतीवर नियोजन समितीसमोर सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या समितीमध्ये एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापक वैदेही रानडे, पर्यावरणतज्ज्ञ पूर्वा केसकर, आशा डहाके, किशोर पाटील व इतर अधिकारी आदींसह तापोळा विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मागण्यांची निवेदन यावेळी लोकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली असून मंगळवारी चार मार्च रोजी ही सुनावणी तापोळा येथे सुरू राहणार आहे.
ग्रामस्थांनी मागितले याचे स्पष्टीकरणशेतकऱ्यांनी प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेऊ नयेत. ग्रामसभा व ग्रामपंचायत यांच्यामार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, खासगी वन जमीन, स्मशानभूमी, प्रशिक्षण केंद्र, बाजारमंडई, वाहनतळ आदी टाकलेली आरक्षणे रद्द करावीत, या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती, आरक्षित नकाशे ग्रामपंचायत स्तरावर लिखित स्वरूपात उपलब्ध व्हावेत, प्रकल्पात सुचवण्यात आलेले मुद्दे हे अंदाजे समाविष्ट केले आहेत, त्यासाठी पुनश्च सर्व्हे करून योग्य ती आरक्षणे समाविष्ट केली जावीत, हा प्रकल्प अंमलबजावणीनंतर मिळकतधारकांना कोणकोणते कर भरावे लागणार आहेत, हे कर भरण्याची प्रक्रिया व लागणाऱ्या परवानग्या याबाबत स्पष्टता यावी, प्रकल्पात ग्रामपंचायतीचा सहभाग स्पष्ट व्हावा आदी मागण्या लोकांच्या वतीने करण्यात आल्या.
नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा कोयना सोळशी, कांदाटीसारख्या अतिदुर्गम भागाला नवसंजीवनी देणारा आहे. मात्र, या प्रकल्पामध्ये विविध डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होत असताना स्थानिक शेतकरी यांचे हित जोपासून अधिकाधिक न्याय मिळावा. शासनाच्या भागीदारीमध्ये शेतकरीकेंद्रित योजना बनवावी तसेच विभागामध्ये फॉरेस्ट, शासकीय जमिनी, भोगावटादार वर्ग २ च्या वतनी जमिनीवर सार्वजनिक आरक्षणे घ्यावीत. - संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते, तापोळा.