सातारा : शाहूनगर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्येत कमालीची वाढ होत आहे. नवीन पाइपलाइनची वाढती मागणी, जुन्या पाइपलाइनला सतत लागणारी गळती, अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे शाहूनगर परिसरातील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे भविष्याची गरज ओळखून शाहूनगरमधील पाइपलाइन बदलण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
पाणीपुरवठा योग्यरीत्या होत नसल्याने पाइपलाइन बदलण्याची वेळ आली असून, योग्य व्यासाची पाइपलाइन टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होऊ लागली. याबाबत नागरिकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यानंतर शाहूनगर, जगतापवाडी परिसरात नवीन पाइपलाइनसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तत्काळ जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद करून नवीन पाइपलाइन टाकावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
या वेळी ऋतुराज देशमुख, मंदार कोळी, संदीप जगताप, नीतिराज सूर्यवंशी, विनोद धुमाळ, राजेश कदम यांच्यासह शाहूनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.