कोरेगाव : ‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कृषी विभागामार्फत व आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.
किन्हई, ता. कोरेगाव येथे कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात कृषीमंत्री भुसे बोलत होते. आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, डॉ. गजाननराव चिवटे, अशोक चिवटे, हणमंतराव जगदाळे, विजयराव घोरपडे, प्रा. अनिल बोधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके आदी उपस्थित होते.
कृषीमंत्री भुसे म्हणाले, ‘महिला सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. कृषी विभागाने आता ३० टक्के योजना महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे आता घरातील माता-भगिनींचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करावे व कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी जादा कागदपत्रांची गरज नाही. एका कागदावर सर्व प्रक्रिया होईल.
आमदार महेश शिंदे यांना कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती आहे. वेळप्रसंगी मी त्यांच्याकडून माहिती घेतो. आमचे भावाभावाचे नाते आहे. त्यामुळे मालेगाव या माझ्या मतदारसंघासह कोरेगावकडे मी लक्ष देणार आहे. कृषी विभागाच्या सर्व योजना कोरेगाव मतदारसंघात प्राधान्यक्रमाने राबविण्यात येत आहेत. मागेल त्याला आता ठिबक सिंचन दिले जाणार आहे, असेही कृषीमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी शेतकऱ्याच्या भूमिकेतून मंत्री भुसे यांचा सातारी कंदी पेढ्यांचा हार, घोंगडे, चांदीची कुऱ्हाड आणि बैलगाडी देऊन आमदार महेश शिंदे, डॉ. गजाननराव चिवटे, अशोक चिवटे व शेतकऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी प्रा. नितीन बानुगडे-पाटील, प्राचार्य अनिल बोधे, अशोक चिवटे, चांगदेव मोरे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.
दरम्यान, कार्यक्रमात कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
बापूसाहेब शेळके यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट :
शशिकांत शिंदे यांच्यावर टीका...
मंत्री दादा भुसे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी खानदेशातील शब्दप्रयोगाचे उदाहरण दिले. त्यांच्या या खुमासदार भाषणाची सर्वत्र चर्चा होती.
चौकट :
कोरेगावात नवा साखर कारखाना उभारणार...
राजकारणापायी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, उसावरुन त्रास दिला जात आहे. आम्हालाही त्रास देता येतो. आम्ही लवकरच साखर कारखाना उभारणार असून, त्याबाबत नंतर सविस्तर बोलेन, असे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट करताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
फोटो ओळ :
किन्हई, ता. कोरेगाव येथे कृषीमंत्री दादा भुसे यांचा घोंगडी, चांदीची कुऱ्हाड आणि बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, डॉ. गजाननराव चिवटे, अशोक चिवटे, सुनील खत्री आदी उपस्थित होते. (छाया : साहिल शहा)
\\\\\\\\\\\\\\\\\\\\