कुकुडवाड : ‘गावातील एक जवान अशाच प्रकारे बर्फाखाली गुढरीत्या बेपत्ता होऊन त्याचा जीव वाचला होता. तो जवान तब्बल दोन वर्षांनंतर गावात आला होता. त्यामुळे माझा मुलगाही घरी चालत येईल,’ अशी शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या आईला आशा होती. त्यातच एक जवान जिवंत सापडल्याची बातमी मंगळवारी दुपारी गावात येऊन धडकली. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या. सर्वांचेच डोळे लकाकले. मात्र, या आशा फार वेळ टिकल्या नाहीत. तासाभरातच सुनील सूर्यवंशी शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले. मस्करवाडीसह संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला.सियाचीन येथे सैनिक दलाची एक तुकडी गस्त घालत होती. यावेळी अचानक हिमकडा कोसळल्याने जवानांची एक तुकडी बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती. त्यामध्ये मस्करवाडी येथील सुनील सूर्यवंशी यांचा समावेश होता. गेल्या सहा दिवसांपासून सूर्यवंशी यांच्यासह अन्य जवानांचे शोधकार्य सुरू होते. सूर्यवंशी यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होते. मात्र, त्यांची आशा ही फार काळ टिकली नाही. मंळगवारी बर्फाच्या ढीगाऱ्याखाली सापडलेल्या जवानांना मृत अवस्थेत बाहरे काढण्यात तपास पथकाला यश आले. यामध्ये सुनील सूर्यवंशी हेही शहीद झाले. या घटनेची वृत्त समजाताच मस्करवाडीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. विठ्ठल सूर्यवंशी व संगीता सूर्यवंशी यांची तानाजी व सुनील ही दोन मुले. सुनील सूर्यवंशी यांचे प्राथमिक शिक्षण मस्करवाडी येथे झाले. यानंतर त्यांनी कुकुडवाड येथील शंभूमहादेव विद्यालयात दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. देश सेवेची आवड निर्माण झाल्याने सुनील सूर्यवंशी २०१० मध्ये सैनिक दलाच्या मेडिकल कोअरमध्ये भरती झाले. (वार्ताहर)दहा महिन्यांची तनया पोरकी...सुनील सूर्यवंशी यांचा विवाह मार्डी येथील पवार कुटुंबातील रेखा यांच्याशी झाला. त्यांना दहा महिन्यांची तनया नावाची एक मुलगी आहे. त्यांचे बंधू तानाजी हे नोकरी करत आहे. सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव गुरुवारी मस्करवाडी येथे आणण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जिवंत जवान सापडल्याच्या बातमीने क्षणभर डोळे लकाकले !
By admin | Published: February 10, 2016 12:09 AM