प्रगती जाधव-पाटील
सातारा - आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या जीवांपासून दिवसाच्या उजेडात स्वत:चे रक्षण करणारे वन्यप्राणी अंधार पडल्यानंतर पाण्यासह शिकारीसाठी बाहेर पडतात. नेमकं त्याच वेळेत नाईट सफारीचं खुळ काढल्याने वन्यप्राण्यांवर भलताच ताण येण्याची चिन्हे आहेत. अशास्त्रीय पध्दतीने कास पठारावर कुंपण घातल्याचे दुष्परिणाम इतक्या वर्षांनी पुढे आले तसेच नाईट सफारीचे होऊ नये अशा तीव्र भावना सातारकरांनी व्यक्त केल्या.
जागतिक वारसास्थळाचे कोंदण लाभल्यानंतर कास पठाराबाबत संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक होते. मात्र, अधिकारी म्हणून येणाऱ्यांनी कुंपणाचा प्रयोग केला. तो अशास्त्रीय असल्याचे त्यावेळीही पर्यावरणप्रेमींनी निदर्शनास आणून दिले तरीही कोणी याकडे लक्ष दिले नाही. कालांतराने फुलांचा बहर ओसरल्यानंतर आता पठारावरील कुंपण काढण्यासाठी शासकीय पातळीवर स्वाक्षरी मोहीम जोरकसपणे राबविण्यात येत आहे. कुंपणासारखेच सफारीमुळेही वन्यप्राण्यांवर, त्यांच्या वावरावर आणि अधिवासावर काही निर्बंध आले तर ते संपूर्ण चक्र बिघडवणारे ठरू शकते, असे या क्षेत्रातीलतज्ज्ञ सांगतात. नाईट सफारीमुळे निशाचर प्राण्यांची दिनचर्या बदलण्याचा धोका मानवाच्या घरापर्यंत धडकण्याची भितीही वर्तविण्यात येत आहे.
दिवसा कर्मचारी मिळेना रात्री कुठून येणार
कासच्या विस्तीर्ण पठारावर लक्ष देण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्याचा फौजफाटा कमी असल्याने वनविभागाला अनेक ठिकाणी लक्ष देणेही कठीण जाते. दिवसा उजेडा काम करायला जिथ वनविभागाला कर्मचारी मिळत नाहीत, तिथं रात्रीच्यावेळी समितीच्या कर्मचाऱ्यांबरोबर वनविभागाचे कोणते कर्मचारी सेवा बजावतील हा प्रश्न आहेच.
दिवसभर सफारी... रात्री पेट्रोलिंग!
सातारा जिल्ह्यात कास पठार हे अनेक पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांना दिवसभर सफारीचा आनंद घेण्यासाठी देशभरात चालतात तसेच दिवसा सफारीचा प्रयोग करण्याचा पर्याय पुढे येत आहे. वनगुन्ह्यांवर अटकाव करण्यासाठी वनविभागाने रात्री पेट्रोलिंग करून दोषींवर कारवाई करावी असा पर्यायही सुचविण्यात येत आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीला कास पठारावर असणाऱ्या रस्त्यावर साधी झाडे लावता आली नाहीत. तलावाची उंची वाढवत असताना झालेल्या बेसुमार वृक्षतोडीचं सोयर सुतकही ज्या समितीला नाही त्यांच्याकडून संवेदनशिल पर्यावरण रक्षणाची अपेक्षा कशी करावी.
- सचिन गायकवाड, पर्यावरणप्रेमी
वन्यप्राण्यांसह पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविभाग आणि वन व्यवस्थापन समिती यांच्यापैकी कोणालाही वन्यजीवांचे काहीच चिंता नाही. नाईट सफारी बघायला मिळेल का नाही माहीत नाही, पण मद्यपींची टाईट सफारी नक्कीच आढळेल.
- किरण कांबळे, पर्यावरणप्रेमी
कासच्या संवर्धनासाठी बेशिस्त गर्दी नव्हे तर दर्दी निसर्गप्रेमी पाहिजेत. इथल्या निसर्गाचा, संस्कृतीचा, परंपरेचा आणि जीवनशैलीचा आदर करतील. निसर्गाने आम्हाला भरभरून दिलेले दान पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवायचे असेल तर नाईट सफारीचा फ ॅड तातडीने बंद केले पाहिजे.
- जगदीश देवरे, पर्यावरणप्रेमी