सातारा : खासदारांनी माझ्या घरी यायचं काय कारण होतं. मी काय त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं नव्हतं. घरी येऊन जो काय त्यांनी प्रकार केला. हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, गुरुवारचा रात्रीचा प्रकार खासदार उदयनराजेंना भारी पडला,असा टोलाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.
उदयनराजेंसह समर्थकांनी गुरुवारी रात्री शिवेंद्रसिंहराजेंच्या बंगल्यावर जोरदार हल्ला केला. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पोलिस मुख्यालयात आले.
दरम्यान, सुमारे अर्धा तास पोलिस अधीक्षकांशी कमराबंद चर्चा केली. यावेळी कोणालाही आतमध्ये सोडण्यात आले नाही. अधीक्षकांशी चर्चा झाल्यानंतर ते बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मला अडकवतायत, मझ्यावर खोटे आरोप करत आहेत. मी लोकांसाठी काम करतो, हा सुरू असलेला आकांडतांडव खासदारांचा साफ खोटा आहे. गुरुवारचा प्रकार त्यांना चांगलाच भारी पडला. हे त्यांनाही माहीतही आहे. पोलिसांनी योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी मी पोलिस अधीक्षकांना भेटलो असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
आनेवाडी टोलनाक्यासंदर्भात ते म्हणाले, आनेवाडी टोलनाक्यावर जो काय प्रकार चालत होता. तो थांबावा. रिलायन्सने नवीन व्यवस्थापन दिलं. या व्यवस्थापनाला कायदेशीररीत्या हस्तांतरण करावं, एवढीच आमची मागणी आहे.ह्
पोलिसांनी तुमच्यावर गुन्हा दाखल का केला? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पोलिसांनी माझ्यावर का गुन्हा दाखल केला, हे मला माहीत नाही. अजून मी माहितीही घेतली नाही नेमका गुन्हा काय दाखल झाला आहे. आमच्या बंगल्याच्या आवारात जे काय घडलं ते आम्ही फिर्यादित म्हटलं आहे. माझे कार्यकर्ते विक्रम पवार यांचा पाठलाग करत खासदार बंगल्यापर्यंत आले. माझ्या कार्यकर्त्यांना धमकी देत गाड्या मागे पुढे करत खासदारांनी दहशत माजविली.