सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी १२३ ग्रामपंचायतींची पूर्णत:, तर ९८ ची निवडणूक अंशत: बिनिवरोध झाली असून, प्रत्यक्षात ६५४ गावांत १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ रोजी उमेदवारांचा फैसला होईल. सध्य:स्थितीत ४६३५ जागांसाठी ९५२१ उमेदवार रिंगणात नशीब घेऊन उतरले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १४९४ आहे. यामधील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील लढतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झालेली आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर पाटणमधील १८, कऱ्हाड १७, माण तालुका १३, जावळी १२, वाई, महाबळेश्वर आणि खटाव तालुक्यांतील प्रत्येकी ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच खंडाळा आणि फलटण तालुक्यांतीलही प्रत्येकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कोरेगावातही तीन ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या ९८ आहे.
सातारा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींत निवडणूक...
जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली. यामधील सर्वाधिक ग्रामपंचायती या सातारा तालुक्यात १३० आहेत. अर्ज माघारनंतर चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार २१ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत:, तर १७ ठिकाणी अंशत: बिनविरोध झाली. दोन ग्रामपंचायतींत अर्ज नाहीत. त्यामुळे ९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होईल.
जिल्ह्यात २६३१ जण आले बिनविरोध निवडून...
जिल्ह्यात यावेळी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. त्यामुळे बिनविरोध झालेले सदस्यही अधिक आहेत. २६३१ जण हे बिनविरोध सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातून सर्वाधिक ४१८, तर पाटण ३६९, जावळीमध्ये ३३९, वाई तालुक्यात २७९ जण बिनविरोध निवडले.
मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर्णत: व अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ६५४ ठिकाणी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यात ९० ग्रामपंचायतींत रणधुमाळी आहे, तर कऱ्हाड तालुक्यात ८७, पाटणमध्ये ७२, कोरेगाव तालुक्यात ४९, वाई ५७, खंडाळा तालुक्यात ५०, फलटण ७४, माण ४७, खटाव ७७, जावळी तालुक्यात ३७ आणि महाबळेश्वमध्ये १४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आहे.
जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
८७८
एकूण प्रभागांची संख्या
२८१३
उमेदवार निवडणूक रिंगणात
९५२१