सातारा : कोण कशासाठी चोरी करेल, याचा सध्या नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला. दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने एकापाठोपाठ नऊ दुचाकी चोरून आपली तलफ भागविण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेमुळे त्याची दुचाकी चोरीची मोहीम थांबली गेली. त्याच्याकडून चोरीच्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.अभिजित ऊर्फ राहुल राजाराम लोहार (वय २४, रा. सोमवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताराशहर परिसरात दुचाकी चोरीचेप्रमाण वाढत असल्याने मोटारसायकल चोरी करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे व शशिकांत मुसळे हे सातारा बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, एक युवक दुचाकी (एमएच ११ एव्ही २७६३) घेऊन एसटी स्टँड परिसरात फिरत असताना त्यांना दिसला. त्याला दुचाकीसह ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता त्याने एसटी स्टँड, राजवाडा, सिव्हिल हॉस्पिटल व कºहाड परिसरातून नऊ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.हा सारा प्रकार तो केवळ दारूची तलब भागविण्यासाठीच करत असल्याचे तपासात समोर आले. त्याला दारूचे व्यसन असून, हे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो दुचाकींची चोरी करत होता. गाडीतील पेट्रोल काढून ते विकून दारू पित असे, तर काहीवेळा दुचाकी अवघ्या पाच ते दहा हजारांतही विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..राहुल लोहारकडून २ दोन लाख ८२ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, शशिकांत मुसळे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, रवींद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, संतोष जाधव, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला.
दारूसाठी युवकाने चोरल्या नऊ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:21 AM