नागठाणे : सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी रविवार घातवार ठरला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एकूण सहा अपघातांमध्ये नऊजण ठार झाले आहेत. तसेच सहाजण जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या अपघातांमुळे पोलिस यंत्रणेवर ताण आला आहे. पुणे येथील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूरमधील सात मित्रांची कार अतीतजवळ उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे मित्र ठार झाले, तर अन्य पाचजण जखमी झाले. रस्त्यावर पडलेल्या जखमी युवकाला वाचविताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राकेश मोहन निगवे (वय २८, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), श्रीपाद सुरेश पेटकर (३३, रा. कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची, तर साईनाथ कुमार डोईफोडे (२५), रोहन विजयकुमार सागावकर (२८), दिनेश महावीर कन्नारी (१९), रोहित दिलीप नष्टे (२५, सर्व रा. शनिवार पेठ, गवळी गल्ली, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राकेश आणि श्रीपाद यांच्यासह अन्य पाचजण शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कारने पुणे येथे गणेशोत्सव पाहण्यासाठी निघाले होते. येथील अतीत बसस्थानकाजवळ चालकाला महामार्गावर एक युवक जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्या युवकावरून आपली कार जाऊ नये म्हणून अचानक चालकाने त्याच वेगात कार वळविली. त्यामुळे कार उलटल्याने त्यामधील राकेशचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीपाद हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. इतर जखमीनांही तत्काळ मिळेल त्या वाहनाने इतर नागरिकांनी रुग्णालयात हलविले. दरम्यान, ज्या युवकामुळे हा अपघात झाला. त्या युवकाचे नाव चंद्रशेखर असल्याचे समोर आले असून, त्याचा रविवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरगाव पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. (वार्ताहर) अन्य चार अपघातांत सहाजण ठार पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर विविध दोन अपघातात दोन ठार झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी गावच्या हद्दीत प्रवासी जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मालखेड फाटा गावच्या हद्दीत कारच्या अपघातात गोरेगाव (मुंबई) येथील दाम्पत्य ठार झाले तर त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत, तर उंब्रज येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध जागीच ठार झाला.
सहा अपघातांत जिल्ह्यात नऊ ठार
By admin | Published: September 11, 2016 11:56 PM