फलटण : विडणी हद्दीतील बेडकेवस्ती येथील राजेश नारायण शेंडे व गणेश महादेव शिंदे यांच्या उसाला अचानक लागलेल्या आगीत राजेश शेंडे यांचे सुमारे सहा लाख रुपयांचे तर गणेश शिंदे यांचे सुमारे तीन लाख असे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे.
ही आग वीज वितरण कंपनीच्या विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन उडालेल्या ठिणग्यांमुळे लागली असल्याची फिर्याद राजेश नारायण शेंडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. राजेश शेंडे हे शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घरी असताना त्यांच्या शेताशेजारी असलेल्या जनाबाई बोडके यांनी त्यांना फोन करुन तुमच्या शेतामध्ये असलेल्या विजेच्या खांबावर जाळ होऊन त्याच्या ठिणग्या उसात पडून उसाला आग लागली आहे.’ अशी माहिती दिली. त्यानंतर राजेश शेंडे तत्काळ शेतात गेले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर आग आटोक्यात आली नाही. या आगीमुळे त्यांचे सुमारे चार एकर क्षेत्रातील उसाचे पीक जळून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तिच आग त्यांचे शेजारी असलेले गणेश महादेव शिंदे यांच्या शेतातील उसास लागून त्यांचे सुमारे दोन एकर क्षेत्रातील उसाचे पीक जळून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.