प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला असून, सर्वच रुग्णालयांना अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.
संसर्गजन्य असलेल्या या व्हायरसपासून सातारकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. केरळमधील कोझीकोड या जिल्ह्यात ‘निपाह’ने थैमान घातले आहे. आतापर्यंत व्हायरसने १३ जणांचा बळी घेतला आहे. यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे पै-पाहुणे, नातेवाईक केरळ आणि कर्नाटकात वास्तव्यास आहेत किंवा पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे सातारकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे. वटवाघळांमळे हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने दक्षिण भारतातील लोकं पर्यटनासाठी सज्जनगड, कास, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी रस्त्यावर बाजूला असणाऱ्या रानमेवा पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. आंबा, जांभळे, करवंद आदी फळे पाहून आपोआप पावले थांबत आहेत. त्यामुळे फळे खाण्याचा मनसोक्त आनंदही ते घेत आहेत, अशा स्थितीत वेळी ‘निपाह’सारख्या हा विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण फळे खाल्ल्याने हा विषाणूचा फैलाव होऊन भीती पसरण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.
वटवाघुळेही कच्ची ताडी, आंबा करवंदे, जांभूळ यासारख्या गोड पदार्थाकडे लवकर आकर्षित होतात. वटवाघुळे रात्री निघतात आणि जेव्हा झाडावरून ताडी भांड्यात पडते, त्यावेळी ते ताडी व आंबे खात असताना त्याच्या शरारातील व्हायरस संक्रमित होते.
सध्या आपण उन्हाळी सुटीसाठी सहलीच आयोजन करतो, बाहेर जाताना वाटेत आंबा, जांभूूळ, करवंदे अनेक प्रकारची उन्हाळी फळे खातो; पण ही फळे सरळ झाडाची वैगेरे खाऊ नये. सध्या विषाणू जीवघेणा ठरत आहे. यावर कोणती ही औषध लस तयार झालेली नाही, तरी गावी जाताना झाडावरून पडलेली आंबा, जांभळे, करवंद व इतर फळे खाऊ नये, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.विशेष म्हणजे, निपाहचा प्रभाव केवळ डिसेंबर आणि मे महिन्यात सर्वाधिक जाणवतो. कारण याच काळात आंबा, ताडी विक्री केली जातेय. गरमी व आद्रतेमुळे वटवाघुळे या वासाकडे आकर्षिक होतात. या जीवघेण्या व्हायरसबद्दल आतापर्यंत कुठलीही लस उपलब्ध झाली नाही, तसेच या विषाणूमुळे होणाºया संसर्गावर कोणतेही उपचार नाहीत.धोका नाही.. तरी अलर्ट राहा..केरळमध्ये संक्रमित झालेला निपाह व्हायरस जीवघेणा आहे, तसेच हा व्हायरस संसर्गजन्य आहे. महाराष्ट्राला या विषाणूपासून धोका नाही, असे सांगण्यात येत आहे. तरी हा व्हायरस कर्नाटकात आल्याने महाराष्ट्रातील सीमा भागात राहणाºयांमध्ये आता चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत सातारकरांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
सध्या केरळ राज्यामध्ये ‘निपाह’ व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने ‘निपाह’ व्हायरसमुळे हायअलर्ट घोषित केला आहे. निपाहची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तत्काळ उपचार घ्यावे.- श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी