दहिवडी : माण पंचायत समितीच्या उपसभापतिपदी नितीन राजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. दरम्यान, राजगे यांना पुन्हा उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे.
माण पंचायत समितीचे उपसभापती तानाजी कट्टे यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून २४ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवारी निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पिठासन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली. सभेस सभापती लतिका वीरकर, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, रमेश पाटोळे, विजयकुमार मगर, नितीन राजगे, तानाजी काटकर, कविता जगदाळे, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर उपस्थित होते. उपसभापती पदासाठी नितीन राजगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर सूचक म्हणून तानाजी काटकर यांनी सही केली होती.
विहित वेळेनंतर शैलेश सूर्यवंशी यांनी नितीन राजगे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नितीन राजगे यांनी पूर्वी अडीच वर्षे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांना पुन्हा एकदा उपसभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.