सातारा : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर शासनाने बंदी घातली असली तरी, साताऱ्यात मात्र याउलट चित्र नजरेस पडत आहे. शहरातील प्रमुख चौक, पान टपऱ्या, तसेच चहाच्या गाड्यांवर बिडी व सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रशासनाकडून कारवाईच होत नसल्याने धूम्रपान करणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.
धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. असे असले तरी सिगारेट, बिडी व तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन करणाऱ्या शौकिनांना जिल्ह्यात काही कमी नाही. साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक येथील टपऱ्या, चहा व वडा-पावचे गाडे आदी ठिकाणी सिगारेट, बिडी खुलेआम ओढली जाते. सिगारेटचे दुष्परिणाम व त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. मात्र धूम्रपान करणाऱ्यांकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्याही सर्वाधिक असून, ही चिंतेची बाब आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश असतानाही गेल्या दीड-दोन वर्षांच्या कालावधित एकावरही कारवाई झालेली नाही. अन्न व औषध प्रशासनाने देखील अद्याप कारवाईचे स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती निर्धास्त आहेत.
दुसरीकडे राज्य शासनाने सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घातली आहे. कोणत्याही टपरीत बिडी अथवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. मात्र, साताऱ्यात शासन नियम पायदळी तुडवून बिडी व सिगारेटची सुटी विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रशासनालाच आता ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
(चौकट)
प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई नाही
शहरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, प्रशासनाकडून दोन वर्षांत एकही ठोस कारवाई झालेली नाही. धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले आहेत. मात्र, याचा आजतागायत उपयोग झालेला नाही.
(चौकट)
‘अन्न, औषध’ला दंडाचे अधिकार प्राप्त
धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पूर्वी अन्न व औषध प्रशासनाला होते. मात्र, आता हे अधिकार संबंधित शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, आगारप्रमुख आदींना प्राप्त झाले आहेत. धूम्रपान करणाऱ्यांवर दोनशे रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
(चौकट)
बिडी-सिगारेट ओढल्याचे धोके
बिडी व सिगारेटमध्ये निकोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. निकोटीन शरीरासाठी घातक आहे. सतत बिडी व सिगारेट ओढण्याने फुफ्फुसाचे आजार बळवतात. तसेच तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो.