फलटण : फलटण तालुक्यात वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणच्या २९ चित्रफिती आपण नाव, जागेसह जिल्हाधिकारी, फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत. परंतु, त्यावर अपेक्षित कारवाई झाली नाही. पत्रकारांना दमदाटीचा प्रकार निषेधार्ह असून, वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर यापुढे कडक कारवाई न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाला बसू, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील वाळू माफियांविरुध्द आपण स्वतः चारवेळा तक्रारी दिल्या आहेत. पुराव्याच्या चित्रफितीच्या (क्लिप) दिल्या आहेत, तरीही अपेक्षित कारवाई झाली नाही. मलठणमध्ये बाणगंगा नदीवर दिवसाढवळ्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे पोलीस व महसूल यंत्रणेला आणखी कुठला पुरावा अपेक्षित आहे. वाळू उपसा थांबला तरी तो नाममात्र एक-दोन दिवस थांबतो मात्र तिसऱ्या दिवशी उपसा पुन्हा सुरु करतात. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांबरोबरीने त्या कार्यक्षेत्रातील मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावरही कठोर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी.
पत्रकारांना दमदाटी व शिवीगाळीची भाषा निषेधार्ह आहे. ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी प्रशासकीय परिस्थिती आहे. वाळू माफियांबरोबरच तेथील मंडल अधिकारी, तलाठी यांच्यावरही उचित कारवाई झाली पाहिजे. वाळू माफियांच्या दादागिरीला कोणाचा पठिंबा आहे, त्यांच्यामार्फत कुणाचा राजकारण करण्याचा प्रयत्न आहे हे उजेडात येणे आवश्यक आहे. वाळू उपसा झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाला बसू, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.
चौकट -
...तो माने कोण
साखरवाडीतील मानेने कोट्यवधी रुपयांची वाळू चोरली आहे. त्याच्याविरोधात फौजदारी झाली पण महसुली कारवाई झाली नाही, असे खासदारांनी सांगितल्याने हा माने कोण, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. प्रांत व तहसीलदार कोठे निघाले की त्याची खबर लगेच वाळू माफियांच्या चेल्याचपाट्यांना मिळते. सध्या महसूल प्रशासनाला वाळू माफियांनी रोख लावल्याचे चित्र असून, त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विचारला आहे.