दहिवडी : कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मंगळवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही दाखल झाला नाही. मात्र, २५ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर, सहायक अधिकारी अतुल यलमर यांनी दिली.
माण बाजार समितीत एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत, तर २०६५ मतदार माण बाजार समितीचे भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकीसाठी मलवडी, म्हसवड, मार्डी या ठिकाणी ग्रामपंचायत व सोसायटीची प्रत्येकी दोन तर दहिवडीमध्ये सोसायटी, ग्रामपंचायत व व्यापारी अशी तीन मिळून एकूण ९ मतदान केंद्रे असणार आहेत.
सोसायटीमधून ११ संचालक निवडून द्यायचे असून ८९५ मतदार आहेत. ग्रामपंचायतमधून ४ संचालक निवडले जाणार आहेत. यासाठी ८३५ मतदार आहेत, तर व्यापारीमध्ये ३३४ मतदार असून दोन संचालक निवडले जाणार आहेत. तोलाईमधून १ जागेसाठी एकच मतदार आहे. त्यामुळे ही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठी १२ जुलैच्या दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत. १३ जुलैला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १४ जुलैपासून २८ जुलैला दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. तर आवश्यक असल्यास ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. तसेच मतमोजणीचे ठिकाणही नंतर जाहीर करण्यात येणार आहे.