सातारा : लोणंदच्या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत १३ सदस्यांनी विरोधात मतदान करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात चार जण गैरहजर राहिले तर १३ पैकी राष्ट्रवादीच्याच एका सदस्यांने विरोधात मतदान केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे लोणंदच्या नगराध्यक्षपदी सचिन शेळके हे कायम राहिले आहेत.प्रातांधिकारी संगीता चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २२ जून रोजी लोणंद नगरपंचायत सभागृहात अविश्वास ठरावावरील मतदानासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यमान नगरसेवक सचिन शेळके पाटील हे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, मासिक सभा घेतल्या जात नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज होत नाही. असे आरोप करीत आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपाच्या तेरा नगरसेवकांनी एकत्र येऊन सचिन शेळके यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यासाठीच्या विशेष सभेमध्ये या ठरावावर हात उंचावून मतदान घेण्यात आले.
यावेळी या ठरावाच्या बाजुने राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या १२ नगरसेवकांनी मतदान केले तर ठरावाच्या विरोधात राष्ट्रवादीचे गटनेते योगेश क्षीरसागर यांनी मतदान केल्याने हा ठराव बारा विरुद्ध एकच्या फरकाने फेटाळ्यात आला. राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच बंडाळी केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सचिन शेळके पाटील यांनी त्यांचे अध्यक्षपद कायम राखले असून आमदार मकरंद पाटील यांना तेरा नगरसेवक एकत्र ठेवण्यात यश आले नाही.ठरावाच्या बाजूने उपनगराध्यक्ष किरण पवार, हनुमंतराव शेळके पाटील, विकास केदारी, श्रीमती शैलजा खरात, हेमलाता कर्णवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, स्वाती भंडलकर, पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके, लिलाबाई जाधव, दिपाली क्षीरसागर यांनी मतदान केले तर ठरावाच्या विरोधात राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी मतदान केले असून नगराध्यक्ष सचिन शेळके, स्नेहलता शेळके पाटील, मेघा शेळके, कुसुम शिरतोडे हे या सभेस अनुपस्थित राहीले. त्यामुळेअविश्वास ठराव बारा विरूध्द एकच्या फरकाने फेटाळण्यात आल्याची माहीती प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिली.नगराध्यक्ष सचिन शेळके समर्थकांत आनंदोत्सवनगराध्यक्ष पद अबाधित राहिल्याने सचिन शेळके पाटील यांच्या समर्थकात आनंद तर इतर बारा नगरसेवकांच्या समर्थकात शांतता पसरली होती. विशेष सभेसाठी प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापुरकर तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी हेमंत ढोकले व नगरपंचायत कर्मचारी यांनी काम पाहीले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेल्या या ठरावाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी विरोधात मतदान केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शांतता पसरली असून आमदार मकरंद पाटील यांना आपल्याच पक्षातील नगरसेवक एकत्र ठेवण्यात अपयश आले. त्यामुळे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदासाठी केलेली खेळी राष्ट्रवादीवरच उलटली आहे.सचिन शेळके, नगराध्यक्ष
- पालिकेत एकूण नगरसेवक - १७
- उपस्थित - १३
- अनुपस्थित - ४
पक्षीय बलाबल
- राष्ट्रवादी संख्याबळ - ६
- काँग्रेस - ५
- अपक्ष - २
- मूळ राष्ट्रवादी सध्या भाजपमध्ये असलेले - ४