सातारा : सुरूचीवर घडलेल्या राड्याप्रकरणी संशयित असलेल्या सुमारे शंभर जणांना शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या असून, गणेश विसर्जन होईपर्यंत साताऱ्यात पाऊल ठेवायचे नाही, असे नोटीसामध्ये बजावण्यात आले आहे. त्यामध्ये आजी, माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरूचीवर राडा झाला होता. यावेळी अनेक गाड्यांची तोडफोडही झाली होती. दोन्ही गटांतील सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी विविध कलमान्वये तीन गुन्हे दाखल केले होते. यामध्ये आजी,माजी नगरसेवकांचाही समावेश होता.
गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून दर वर्षी पोलिसांकडून गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार केली जाते. अशा लोकांना विसर्जन होईपर्यंत शहरात येऊ नये, अशा प्रकरचे आदेश दिले जातात.
शाहूपुरी पोलिसांनी यंदाही एकूण १५५ जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामध्ये शंभरजण हे केवळ सुरूची राडाप्रकरणाशी संबंधित आहेत. पोलिसांनी दिलेल्या नोटिसामुळे आजी, माजी नगरसेवकांना यंदाही विसर्जन मिरवणुकीला मुकावे लागणार आहे. पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी ही कारवाई केली आहे.