सातारा : कोणत्याही मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारली जाणार नाही याची दक्षता सातारा विकास आघाडीने घेतली आहे. हद्दवाढ भागातील मिळकतींना अधिनियमातील कलमाप्रमाणे प्रथम वर्षी २० टक्के आकारणी होणार आहे,’ अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शहरास हद्दवाढ भागातील निवासी, बिगरनिवासी, मिळकतींचे चतुर्थ वार्षिक पाहणीचे म्हणजेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सहायक संचालक, नगररचना, सातारा यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये निश्चित केलेल्या वार्षिक भाडे अंदाजानुसार, मिळकत कर आणि उपकर, पाणीकर यांची बिले सर्व मिळकतधारकांना पाठविली जातील. जर अवाजवी घरपट्टी असेल असे मिळकतधारकांना वाटत असेल तर त्यांनी आपली मिळकत जुनी असेल तर जुन्या मिळकतकराप्रमाणे घरपट्टीची रक्कम भरावी. जर मिळकतकर पहिल्यांदाच आकारला जात असेल तर आलेल्या बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून मिळकतधारकांना अपील करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.पालिका अधिनियमानुसार अपील समिती सर्वसाधारणपणे प्रांताधिकारी, सहायक संचालक, कोल्हापूर किंवा सांगली, नगराध्यक्ष, महिला बाल कल्याण सभापती आणि विरोधी पक्षनेता या पाच जणांची असते. यापैकी कोणी कमी असेल तर समितीचे अध्यक्ष म्हणजेच प्रांताधिकारी हे निर्णय देऊ शकतात व तो निर्णय समितीचा निर्णय समजला जातो. त्यामुळे कोणावरही अवाजवी कर लादला जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी ज्या त्यावेळी आम्ही स्वत: व सातारा विकास आघाडी घेणार आहे.परंतु काही मंडळी कशाचे भांडवल करतील आणि कसे लोकांना बिथरवतील हे सांगता येत नाही. सर्वसामान्य सातारकर आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या जाणिवेतून, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत अवाजवी आकारणी होणार नाही, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारणार नाही, उदयनराजेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 1:47 PM