कऱ्हाड विमानतळाचा विस्तार नाही, अजित पवारांनी मांडले रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:32 PM2022-05-17T17:32:24+5:302022-05-17T17:32:53+5:30
कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती.
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाची गरज आहे का? आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करायला लागलोय, त्याला निधी उभा करताना नाकीनऊ आले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तरी आहे. कऱ्हाडला तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे सरकार आहे तोपर्यंत कऱ्हाडला विमानतळ विस्तारीकरण नाही, असे रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार कऱ्हाड दौऱ्यावर असताना विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समितीने त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी पवार यांनी स्पष्टपणे आपले मत सांगितले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रशांत यादव, कृती समितीचे दाजी जमाले, पंजाबराव पाटील, रमेश लवटे, संभाजी साळवे, मोहम्मद आवटे उपस्थित होते.
खरंतर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कऱ्हाडला विमानतळाची उभारणी झाली. पुढे दिवंगत डॉ. पतंगराव कदम उद्योगमंत्री असताना येथे नाईट लँडिंगची सुविधा करण्यात आली तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. पण तो प्रस्ताव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कऱ्हाड शहरालगतच्या गोटे, मुंढे व वारुंजी या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी या प्रकल्पात जात आहेत. शिवाय शहरालगतच्या जमिनींना मोठा भाव आहे. तसेच भविष्याचा वेध घेता शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. त्याचाच भाग म्हणून कृती समितीने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना दिलासा दिला. कऱ्हाडला विमानतळ विस्तार करण्याची गरज आहे का? असा उलट प्रश्न त्यानी केला.
खरंतर आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करीत आहोत. तेथे त्याची गरज आहे. मात्र त्यालाही आमच्याकडे निधी अपुरा आहे. चाकण, पुणे येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. मोठमोठे उद्योगपती सकाळी विमानाने पुण्यात येऊन संध्याकाळी परत घरी जातात. तेथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. पण कऱ्हाडात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आमचा विस्तार करण्याचा विचार नाही, असे त्यांनी सांगून टाकले.
'लोकमत'ने यापूर्वीच मांडली होती स्पष्ट भूमिका
कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती. याबाबत काही लोकांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला दुजोरा देत कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
अनेकांनी मोबदला घेणे केले पसंत
विमानतळ विस्तारीकरणात ज्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत त्यांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला देण्यात येत आहे .बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी तो मोबदला घेणे पसंत केले असले तरी बरेच शेतकरी आपल्या विरोधावर आजही ठाम आहेत. त्याची प्रचिती रविवारीही आली.
कृती समितीची स्थापना
- विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिकांना याची झळ लक्षात आली.
- कसदार जमिनी अधिग्रहण होऊ लागल्या. त्यामुळे बाधितांनी कृती समिती स्थापन करून लढा उभारला. सुरुवातीला या कृती समितीने विस्तारीकरणाला विरोध करीत भव्य मोर्चा काढला.
- त्याची सांगता सभा कराडच्या लिबर्टी मैदानावर झाली होती. तेव्हा दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर व तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील यांनी सभेला उपस्थित राहून कृती समितीला पाठिंबा दिला होता.