सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा फटका जसा उद्योग, व्यवसायांना बसला तसाच लग्नकार्यात देखील कोरोनाने मोठा अडथळा निर्माण केला आहे. नोकरीची गॅरंटी नसल्याने आता छोकरीची निवडही लांबणीवर पडत चालली असून, रजिस्टर लग्नाची संख्याही कमी झाली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत केवळ ११४ जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे रेशीम गाठीत अडकण्याचे अनेकांचे स्वप्न सध्या तरी लांबणीवर पडले आहे.
(चौकट)
सहा महिन्यांत केवळ ११४ नोंदी
- अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अनेक जोडपी रजिस्टर विवाहाचा पर्याय निवडतात.
- कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत केवळ ११४ जोडप्यांनी उपनिबंधक कार्यालयात विवाहासाठी नोंदणी केली आहे.
(कोट)
मी पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होतो; परंतु कोरोनामुळे कर्मचारी कपात झाली आणि माझी नोकरी गेली. स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारावा म्हटले तरी जवळ मोठे भांडवल नाही. आताची परिस्थितीदेखील व्यवसाय करण्याची नाही. त्यामुळे सध्यातरी विवाहाचा विचार करू शकत नाही.
- संजय चव्हाण, सातारा
(कोट)
शासकीय नोकरी मिळत नाही आणि खाजगी नोकरीची काही शाश्वती नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दूरवर ढकलला आहे. रजिस्टर विवाह केल्यास खर्चाची मोठी बचत होते. परिस्थिती पूवीसारखी झाली की विवाह उरकून टाकणार आहे.
- दिलीप ओव्हाळ, सातारा
(कोट)
गेल्या दीड वर्षापासून रजिस्टर विवाहाचे प्रमाण कमी झाले आहे. रजिस्टर विवाहाला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. पूर्वी महिन्याला सरासरी ३० ते ४० विवाह होत होते. आता ते प्रमाण कमी झाले आहे.
- विजय जगताप, दुय्यम निबंधक
(चौकट)
कधी किती झाली नोंदणी विवाह?
२०१८ २८७
२०१९ ३१८
२०२० २२७
२०२१ जानेवारी ३७
२०२१ फेब्रुवारी १५
२०२१ मार्च १९
२०२१ एप्रिल ११
२०२१ मे १२
२०२१ जून १२
२०२१ जुलै ०८