रामापूर : मल्हारपेठ हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव आहे. या विभागात राष्ट्रवादीने राजकीय बळ वाढविण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता वाॅर्डनिहाय युवक पदाधिकारी व फादर बाॅडीच्या निवडी केल्या. तळागाळापर्यंत संघटना असली तरच पक्ष चालतो आणि संघटना असल्याशिवाय कुठलंही नेतृत्व उभारत नाही. विकासाला चालना देण्यासाठी संघटना गरजेची आहे, त्याची पायाभरणी मल्हारपेठमध्ये झाल्याने गावा-गावात ही संघटना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला. मल्हारपेठ येथे राष्ट्रवादी युवकचा मार्गदर्शन मेळावा व पदाधिकारी निवडीच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोयना कृषक संस्थेचे अध्यक्ष बाबूराव सुतार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकर शेडगे, उपसरपंच नवनाथ चिंचकर, बाजार समितीचे संचालक आनंदराव पवार, सदस्य नीलेश चव्हाण, अवधूत कांबळे, संगीता वाघ, सुषमा चव्हाण, भाग्यश्री हिरवे, महिपती कदम, विजय पवार, शहाजी कदम, प्रदीप चव्हाण, श्रीकांत पालसांडे उपस्थित होते.
पाटणकर म्हणाले, ‘तरुण वर्ग हा सोशल मीडियावर असतो आणि आपल्या पक्षाची ध्येयधोरणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करावीत. जास्तीत-जास्त तरुणांना आपल्या पक्षाकडे आकर्षित केले पाहिजे. निवडणूक पुढे नसतानाही मल्हारपेठच्या तरुण युवकांनी पक्ष बांधणीसाठी पाऊल उचलले आहे. पाटण तालुक्यात या तीन वर्षांत पहिली संघटना मल्हारपेठमध्ये उभी राहिली. इतर गावांमध्येही या संघटनेचा आदर्श घेऊन काम केले जाईल.’
समीर कदम यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव शेडगे यांनी आभार मानले.