सातारा : ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार केंद्र सरकार करत असते. सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम ते नेहमी करतात; पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू देत. त्यामुळे अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला.महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल आणि सर्व जण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल. सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यांत, नंतर एक वर्षात पडणार, असे भविष्य अनेक जण वर्तवीत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही अधूनमधून भविष्य वर्तवीत असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांचा शिस्तीचा कित्ता लक्ष्मणराव पाटील यांनी सुरू ठेवला. त्यानंतर आता मकरंद पाटील यांनीही सुरू ठेवला आहे.
‘युवकांना संधी’ - राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. युवकांना निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे, अशा त्यांच्या अपेक्षा असणे साहजिकच आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी निवडणुका एकत्रित लढायच्या का, याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याबाबतचे नियोजनही करण्यात आले. तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये युवकांना संधी दिली जावी याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.