सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात एकीकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन जीवतोड मेहनत घेत आहे. मात्र, दुसरीकडे मूठभर नागरिकांचा निर्धास्तपणे कोरोना वाढीस कारणीभूत ठरु लागला आहे. पालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करूनही अनेक वाहनधारक व पादचारी मास्क लावण्याची तसदी देखील घेत नाहीत.
कोरोना रुग्ण वाढू लागल्याने राज्य शासनाने रविवारपासून निर्बंध आणखीन कठोर केले आहेत. जिल्हा प्रशासनानेदेखील संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांची तीव्रता गतिमान केली आहे. सध्या मास्कचा वापर न करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पालिका व पोलीस प्रशासनाची गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेची अनेक नागरिक धास्ती घेत असून, मास्क वापरू लागले आहेत.
परंतु कारवाई व जनजागृती करूनही काही पादचारी व वाहनधारक निर्धास्तपणे वावरताना दिसतात. साधा मास्क लावण्याची तसदीदेखील या महाभागांकडून घेतली जात नाही. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, ही परिस्थिती धोक्याची घंटा देऊ लागली आहे.
कोरोनाच्या दोन लाटेतून तरी बोध घ्या :
सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने जबर तडाखा दिला. या लाटेत कधीही भरून न येणारे नुकसान झाले. अनेकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावला. अनेक कुटुंबे अजूनही या दुःखातून सावरलेली नाहीत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन नागरिकांना सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, या नियमांना हरताळ फासला जात आहे.
नागरिकांनो हे करा
- घरात करमत नाही म्हणून उगाच भटकंतीला बाहेर पडू नका
- अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा
- मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा
- कोणतेही आजार अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित उपचार घ्या
- आपल्या परिसरात बाहेरून कोणी आल्यास याची तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती द्या