सातारा : देशाच्या स्वातंत्र्याची आताची दुसरी लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्वजण रात्रंदिन काम करुन इंडिया आघाडीच्या विजयासाठी काम करतील. सातारा मतदारसंघात कोणीही उमेदवार द्या. त्यांच्या विजयाची जबाबदारी आमच्यावर राहील, असा विश्वास इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केला.सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उमेदवार ठरविण्यासाठी अध्यक्ष शरद पवार हे सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी इंडिया आघाडीची बैठक एका हाॅटेलमध्ये झाली. या बैठकीत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उदयसिंह पाटील, अॅड. वर्षा देशपांडे, दीपक पवार, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
साताऱ्यात शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भावनाही एेकून घेतल्या. यावेळी प्रमुख मान्यवरांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबद्दल आपले मत मांडले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने कोणताही उमेदवार द्यावा, तो सर्वव्यापी असावा. सक्षम तसेच सर्व परिचित असावा, अशी विनंती करण्यात आली.तरीही शरद पवार जो उमेदवार साताऱ्यासाठी देतील त्याच्या विजयासाठी आम्ही रात्रंदिन काम करु. कारण, देशात हुकुमशाही आहे. भाजपने ४०० च्या वर जागा जिंकण्याची घोषणा दिली आहे. त्याला खीळ घालण्याचे काम साताऱ्यातून करण्यात येईल, असा एल्गारही यावेळी मान्यवरांनी बोलून दाखवला. त्यामुळे सातारच्या या इंडिया आघाडीच्या बैठकीत एकीच दिसून आली.