सातारा : महाविकास आघाडीने बैठकांचा सपाटा लावला असतानाच आता महायुतीनेही रणशिंग फुंकलंय. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिलीच बैठक साताऱ्यात घेऊन उमेदवार कोणीही असो आम्ही एकसंध आहोत, असे दाखवून दिले. तसेच ८ एप्रिलला मतदारसंघातील तीन शहरात मेळावे घेण्याचेही निश्चीत केले. पण, या बैठकीनंतर ‘रिपाइं’ आठवले गटाने मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत तटस्थ राहण्याचा इशाराही दिला आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचा शरद पवार गट ही निवडणूक लढविणार आहे. तर महायुतीत मतदारसंघ शिवसेनेकडे असलातरी सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवस शिल्लक राहिले असलेतरी अजुनही युतीत मतदारसंघ कोणाकडे हे स्पष्ट नाही.पण, खासदार उदयनराजे भोसले हे तयारीत आहेत. त्यामुळे मतदारसंघ भाजपकडे जाण्याचीच अधिक शक्यता आहे. अशातच अजुनही आघाडी तसेच महायुतीचाही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे लढत कशी राहणार हेही स्पष्ट नाही. असे असलेतरी प्रचारात महाविकास आघाडी पुढे आहे. आघाडीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्यात. या बैठकांना आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र दिसले. पण, महायुतीत तिढा असल्याने राजकीय वातावरण शांत होते. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोमवारी प्रथमच महायुतीची मोठी बैठक साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये पार पडली.
या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, लोकसभा संयोजक सुनील काटकर, मनोज घोरपडे, साधू चिकणे, सागर भोगावकर, अण्णा वायदंडे, शारदा जाधव, सचिन नलवडे, प्रकाश साबळे आदी उपस्थित होते.पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक जवळपास ५० मिनीटे चालली. यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी निवडणुकीला एकसाथ सामोरे जाण्याबाबत निश्चय केला. तसेच उमेदवारीचा निर्णय वरिष्ठस्तरावरुन होईल. त्यामुळे उमेदवार कोणी का असेना त्याचे पालन करु, असाही निर्धार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर दि. ८ एप्रिलला प्रथम कऱ्हाड, त्यानंतर सातारा आणि वाई येथे मेळावे घेण्याचेही निश्चीत करण्यात आले. त्यामुळे महायुतीनेही निवडणुकीची पूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणूक नियोजनासाठी महायुतीची बैठक झाली. आता साताऱ्याचा उमेदवार कोण असेल ते राज्य नेतृत्व ठरवेल. त्याचे पालन आम्ही करणार आहे. तसेच उमेदवार कोण याची वाट न पाहता निवडणूक कामाला सुरूवातही करीत आहोत. यासाठी दि. ८ एप्रिलला मतदारसंघात तीन मेळावे घेणार आहोत. माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीकडून समोर येत असेल तर पाहू. पण, अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणतेही भाष्य करता येणार नाही. - शंभूराज देसाई, पालकमंत्री
बैठकीत ‘रिपाइं’ने नाराजी व्यक्त केली. कारण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे ही महायुती झाली तसेच सत्ताही आलेली आहे. तरीही आम्हाला युतीत आहे पण, सत्तेत आहोत असे वाटत नाही. कारण, आम्हाला शासकीय समितीत घेण्यात येत नाही. निवडणुकीसाठी मतदारसंघ दिला जात नाही. ही चूक दुरुस्त करतो म्हणत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीत तटस्थ राहणार आहोत. - अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष ‘रिपाइं’ आठवले गट