ना सभा, ना मेळावा; शक्तीप्रदर्शनातून साताऱ्यावर दावा; अजितदादांचा १४० किलोमीटरचा रोडशो

By नितीन काळेल | Published: September 9, 2023 07:12 PM2023-09-09T19:12:01+5:302023-09-09T19:25:10+5:30

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येणार असल्याने दादाप्रेमींनी जय्यत तयारी केली

No meeting, no assembly; Claim to Satara through show of force; Ajit Pawar will do a 140 km roadshow | ना सभा, ना मेळावा; शक्तीप्रदर्शनातून साताऱ्यावर दावा; अजितदादांचा १४० किलोमीटरचा रोडशो

संग्रहित छाया

googlenewsNext

सातारा : राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात दोनदा एंट्री करुन धडाका केला. शेकडो कार्यकर्ते पाठिशी असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर भाजबरोबरच गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी प्रथमच जिल्ह्यात येत असून समऱ्थक स्वागतासाठी एक हजार गाड्या नेणार आहेत. यावरुन कोणतीही सभा, मेळावा नसाताना यातून दादा गट पक्षाची मोट बांधू लागला आहे.

सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खरे प्रेम केले ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच. आजही जिल्हा पवार यांच्यावर भरभरुन प्रेम करतो. पण, मागील पाच वर्षांत भाजपने राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. तरीही पवार यांच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही. मात्र, राष्ट्रवादीतच आता दोन गट पडलेत. त्यामुळे सातारा जिल्हाही दोन गटातच विभागलाय. त्यातच दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी भाजपशी संधान बांधले त्याच्या दुसऱ्या दिवशीच शरद पवार यांनी कऱ्हाडला राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन भाजप आणि पक्ष सोडणाऱ्याविरोधात रणशिंग फुंकले हाेते. त्यानंतर साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा हल्ला केला.

मागील दोन महिन्यात दोनवेळा शरद पवार आले होते. यामुळे पवार प्रेमी गट आणखी सक्रिय झाला. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात त्यांची सभा नसलीतरी ते कऱ्हाडमार्गे सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरला जाणार आहेत. तरीही अजित पवार प्रथमच जिल्ह्यात येणार असल्याने दादाप्रेमींनी जय्यत तयारी केली आहे.

रविवारी सकाळी अजित पवार यांचा शिरवळ येथे जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. त्यानंतर महामार्गाने ते कोल्हापुराकडे जातील. या प्रवासात दादाप्रेमींनी स्वागताची कसलीही कसर ठेवायची नाही हे निश्चीत केले आहे. यासाठी जिल्ह्यातून एक हजार गाड्या दादांच्या स्वागतासाठी आणि संपूर्ण दाैऱ्यात राहतील असे नियोजन केलेले आहे. यासाठी माण, खटाव, फलटण, वाई या तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे हे नेते चार दिवसांपासून दादांच्या स्वागताला कोठेही कमी पडू नये यासाठी धडपड करत आहेत. यातून दादाप्रेमींनी आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दादांच्या स्वागतला येतील ते आपल्याकडे आहेत, असे समजले जाणार आहे. त्यातून भविष्यात काय रणनिती आखायची, कोणाला जवळ करायचे याचा विचार केला जाणार आहे. त्यादृष्टीनेच सध्या पावले पडत आहेत.

अजितदादांचा १४० किलोमीटरचा रोडशोच...

अजित पवार हे रविवारी येत असलेतरी त्यांचा जिल्ह्यात कोठेही जाहीर कार्यक्रम नाही. महामार्गाने ते येथील आणि पुढे जातील. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत होईल. म्हणजे शिरवळ ते कऱ्हाड-वाठार यादरम्यान त्यांचा एकप्रकारे रोड शोच होणार असून शिरवळ ते वाठार हे सुमारे १४० किलोमीटरचे अंतर असणार आहे.

Web Title: No meeting, no assembly; Claim to Satara through show of force; Ajit Pawar will do a 140 km roadshow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.