लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. वारंवार सूचना करूनही भाजीविक्रेते, दुकानदार व नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. खरेदीसाठी नागरिक सातत्याने घराबाहेर पडत आहेत. गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांचादेखील वावर सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्याची अवस्था ‘नियम कोणी पाळेना.. संक्रमण थांबेना आणि साखळी तुटेना’ अशीच झाली आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहे. या सेवा घरपोच उपलब्ध करण्याची व्यवस्थादेखील प्रशासनाने उभी केली आहे. तरीही अनेक दुकानदार मागच्या दाराने दुकान चालवीत आहेत. हॉटेल व्यवसायदेखील अशाच पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी दिवसभर घराबाहेर पडत असून, एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. परिणामी कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढू लागली आहे.
सद्य:स्थितीला जिल्ह्यातील सुमारे १९ हजार कोरोना रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. त्यापैकी काहीजण नियमांचे पालन करीत आहेत, तर बहुतांश रुग्ण कोणत्या न कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत. पालिकेने असे घर अथवा अपार्टमेंट सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. असा परिसर बॅरिकेटिंने सील केला आहे. तरीही कोरोनाबाधित रुग्ण बॅरिकेटिंगच्या बाहेर येऊन फेरफटका मारत आहेत. अशा रुग्णांचा हा निर्धास्तपणा कोरोना संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास जिल्हा प्रशासनाला अधिक कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
(चौकट)
जिल्हा प्रशासनाने साताऱ्यातील सर्व भाजी मंडई बंद ठेवून आडत व्यापाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे मैदान खुले केले आहे. या ठिकाणीदेखील फिजिकल डिस्टन्सचे एकाही विक्रेत्याकडून पालन केले जात नाही. बहुतांश व्यापारी मास्क न लावताच वावरत असतात. सकाळी सात ते नऊ या वेळेत व्यापारी विक्रेते व नागरिकांची येथे खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
(चौकट)
विनाकारण फिरणारे सुसाट
घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांकडून वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडे मेडिकल, रुग्णालयाचे कागदपत्र आहे का नाही हे देखील पाहण्यात आले. कारवाईच्या धास्तीने अनेक वाहनधारक गल्लीबोळांतून ये-जा करताना दिसून आले.
(पॉइंटर)
पाच दिवसांत दहा हजार बाधित
दि. बाधित
९ : २३७९
१० : २३३४
११ : २५०६
१२ : १६२१
१३ : २०६५
एकूण १०९०५
फोटो मेल :
साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गुरुवारी आडत व्यापाऱ्याची गर्दी झाली होती. व्यापारी व विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आले. (छाया : सचिन काकडे)