सातारा : ‘पक्षाला उभारी येण्यासाठीच पक्षाध्यक्षांनी कामे व जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. नवीन कार्याध्यक्षांना थोडा वेळ दिला पाहिजे. मलाही पक्षाने विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाकरी फिरवली वगैरे काही नाही. हे विरोधी पक्षांनी व मीडियाने चालवलं आहे. निवडणुकीची जबाबदारी मला आजच नव्हे, तर पक्षस्थापनेपासून नाही. तरी माझे निर्णय डावलले जात नाहीत. यापुढेही मला कोणी विरोध करणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी साताऱ्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना जबाबदारी दिली. माझ्यावर जबाबदारी टाकलेली नसल्याचे संदेश फिरत आहेत; परंतु माझ्यावर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे; तसेच पक्षाचे विविध दौरे, पक्षीय अधिवेशने व कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर फिरून माझी जबाबदारी पार पाडतच आहे. मला केंद्रातल्या राजकारणात रस नसून राज्यात काम करायचे आहे. भाकरी फिरवल्याचे फडणवीस म्हणत असले, तरी राष्ट्रवादीने काय करायचे, हे राष्ट्रवादीची कार्यकारिणी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ठरवतील.’
भाजपमध्ये गेलेले नेते तुमच्या संपर्कात आहेत काय, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘आम्ही काय एकमेकांचे दुश्मन नाही. सत्तेत असताना पक्ष न पाहता सर्वांचे काम करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात करण्याचे काहीच कारण नाही. सरकार कोणाचेही असो; अशा घटना घडू नयेत. या घटनांचा सखोल तपास केला करून मास्टरमाईंड शोधून काढला पाहिजे.बावनकुळे यांनी छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला यावर ते म्हणाले, ‘बावनकुळेंना वाटून काय उपयोग? तसे मला आणि भुजबळ यांना वाटले पाहिजे ना.’
शशिकांत शिंदेंना खुराक सुरू करू काय?
शशिकांत शिंदेंना ताकद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. यावर पवार म्हणाले, ‘आपण आपली ताकद स्वत: निर्माण करायची असते. पक्ष ताकद देत नाही म्हणजे काय त्यांना खोबरं, खारीक, बदाम, पिस्ते असा खुराक सुरू करून देऊ काय. पक्षात सर्वांनाच सारखेच महत्त्व दिले जाते. ग्रीन सिग्नल वगैरे काही नाही.’