सातारा : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने मंगळवारपासून १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करून संचारबंदी लागू केली. ही माहिती सातारकरांना सोशल मीडिया, प्रसारमाध्यमातून समजली. त्यानंतर सातारकरांनी संचारबंदी काळात अडचण येऊ नये म्हणून रखडलेली कामे सुरू केली. त्यामुळे बहुतांश गिरण्यांमध्ये दळणासाठी गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्यांना घरातून बाहेर पडण्यासच मज्जाव केला आहे. विनाकारण फिरताना आढळत असल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच अत्यावश्यक दुकाने वगळले तर सर्वच व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सकाळीच जवळच्या गिरणीत जाऊन गिरणी सुरूच राहणार की बंद याबाबत विचारणा करत होते, तर बहुतांश जण डबे घेऊन दळणासाठी येत होते. मात्र, पोलीस कोणत्याही क्षणी येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना डबे ठेवून जाण्यास सांगितले जात होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळेला जाऊन ग्राहक पुन्हा डबे आणत होते.
पापडासाठी तयारी
संचारबंदी असल्याने सर्वच खासगी दुकाने, कार्यालये बंद असणार आहेत. महिलांनी घरात बसून पापड करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पापडासाठी लागणाऱ्या दाळी दळणासाठीही गर्दी होत आहे.