सातारा : ग्रामविकास अधिकाऱ्यामधून विस्तार अधिकारीपदी पदोन्नती, निलंबित ग्रामसेवकांना पुर्नस्थापित करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या ग्रामसेवकांना कार्यमुक्त करणे या प्रलंबित मागण्यांसह अन्य प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामुळे आढावा सभांना गैरहजर आणि अहवाल पाठविणेही बंद झाले आहे.याबाबत संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे वेळेचे बंधन न पाळता अहाेरात्र काम केले. शासनाच्या योजना, अभियाने यशस्वीपणे राबविली. पण, यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या ग्रामसेवकांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे. आतापर्यंत ग्रामसेवकांच्या अडचणींबाबत समस्या निवारण सभा आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे आस्थापनाविषयक अनेक बाबींची सोडवणूक झाली नाही. त्यातच अपामानास्पद वागणूक मिळत असल्याने ग्रामसेवकांत असंतोषाची भावना पसरली आहे. याबाबत सातारा जिल्हा ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) ची सभा झाली. त्यामध्ये सर्वानुमते सहकार आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आंदोलन सुरू करत आहोत.
ग्रामसेवकामधून ग्रामविकास अधिकारी पदोन्नती तीन वर्षांपासून प्रलंबित आहे ती करण्यात यावी, कालबध्द पदोन्नती प्रस्ताव १०.२०.३० मंजुरी आदेश, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्य मुल्यांकन अहवाल/ गोपनीय अहवाल प्रलंबित आहेत ते तातडीने मिळावेत, प्रलंबित मेडिकल बिलाच्या देयकास मंजुरी द्यावी, विभागीय आयुक्तांकडे अपवादात्मक बदलीसाठी शिफारशी करणे आदी मागण्यांसाठीही हे असहकार आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्व शासकीय ग्रुपमधून बाहेर पडतील, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आढावा सभांना गैरहजर राहतील. सर्व ग्रामसेवक नियमीत कामकाज करतील पण, कोणताही अहवाल देणार नाहीत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित चव्हाण, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर, सरचिटणीस संदीप सावंत आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.
आंदोलनाचा टप्पा असा..२० आॅगस्टपासून असहकार आंदोलन२६,२७ आणि २८ आॅगस्ट जिल्हा परिषदेसमोर धरणे२९ आॅगस्टपासून सामुहिक रजा आंदोलन