सातारा : राज्यात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवायचे आहे. यासाठी लोकांना बरोबर घ्या, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्या. जे पदाधिकारी काम करणार नाहीत, त्यांनी बाजूला व्हावे. नवीन पदाधिकाऱ्यांचीही लवकरच नियुक्ती करू. पक्षाची एकनिष्ठ वागा, असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी साताऱ्यातील बैठकीत सुनावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यातून पदाधिकारी काही बोध घेणार आणि काँग्रेसची ताकद वाढविणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सर्वच ठिकाणी काँग्रेसचीच सत्ता होती. पण, १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तडे गेले आणि नंतर हळूहळू ताकद कमी होत गेली. आता तर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. सद्य:स्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच सर्व मदार आहे. त्यांच्याकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरूच आहेत. पण, जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरावे लागणार आहे.त्यातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अंतर्गतच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि सातारा जिल्हा निरीक्षक सचिन सावंत सातारा जिल्हा दाैऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचे काम केले. तसेच कानउघाडणीही केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीत सचिन सावंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, बाबासाहेब कदम, मनोहर शिंदे, राजेंद्र शेलार, अजित पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, रजनी पवार, संदीप माने, अरबाज शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सावंत यांनी काँग्रेस पक्षाला मजबूत करायचे आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे स्पष्टपणे बजावले. तसेच निवडणुकीत पराभव झाला असला तरी मरगळ झटकून पुन्हा नव्याने उभे राहावे लागेल. लोकांना बरोबर घेतले तर पुन्हा सत्ता मिळवू शकतो, असा विश्वासही निर्माण केला. पद मिळते म्हणून मिरवायला येते ही भूमिका सोडा, पक्षाबरोबर एकनिष्ठ वागा. इतर राजकीय पक्षाशी जवळीक ठेवून कामे करू नका, असेही सुनावल्याचे समोर येत आहे. यामुळे सावंत यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा चांगलाच धडा घेतल्याचे स्षष्ट होत आहे.
समाधानकारक काम नसणाऱ्यांना सुनावले..सचिन सावंत यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय आढावाही घेतला. पक्षाची ताकद किती, सत्ता कोठे आहे, पक्षवाढीसाठी काय करावे लागेल, याची माहिती घेतली. या आढाव्यात समाधानकारक काम नसलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनावलेही. तसेच त्यांना पुढील काळात कामात सुधारणा करा, अशी सूचनाही केली. तर काही पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात नवीन पदाधिकारी नियुक्ती, पक्षात तरुणांना संधी देण्याबाबत सूचना केली.