रशीद शेख -- औंध खटाव तालुक्यातील नांदोशी येथील पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावर सहा महिन्यात तिघांनी अपघातात जीव गमावला आहे. प्रवाशांच्या जिवावर उठलेला हा पूल अजून किती बळी घेणार, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उमटत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. औंधवरुन सातारा, पुसेसावळीला जाण्यासाठी या प्रमुख मार्गावरुनच ये-जा करावी लागते. तसेच या पुलाच्या रस्त्यावरून औंधला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. नांदोशी गावच्या हद्दीत असणाऱ्या पूलावरुन प्रवास करताना वळणाकृती रस्ता असल्याने वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नाही. शिवाय या धोकादायक पुलाला गार्डस्टोन अथवा सुरक्षाकठडे नसल्याने चालकांना पुलाचा अंदाज येत नाही. अनेकदा वळण न घेता आल्याने वाहने रस्त्यावरून खाली गेल्याच्या घटनांही घडल्या आहेत. गेल्या वर्षभरात या पुलाने अनेक बळी घेतले असून या पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी रेलिंग, सूचनाफलक, उतारांच्या बाजुने गतिरोधक अशा सुविधा करणे आवश्यक आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याबरोबरच पुलाची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून संबंधित विभागाला काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सामाजिक संघटना आक्रमक पुलाबाबत लवकरात लवकर निर्णय होऊन पुलाच्या दोन्ही बाजूला चार फुटांच्या भिंती बांधाव्यात. त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल. एवढी तर मानसिकता संबंधित विभागाने दाखविण्याची मागणी श्री सोशल फाउंडेशन, जनता क्रांती दल, आजी-माजी सैनिक सेवा संस्था, शेखर गोरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी केली आहे.वरवरचे उपाय नकोतएखादा अपघात झाला की संबंधित विभागाकडून दुसऱ्या दिवशी चुना लावलेले पंढरे दगड दोन्ही बाजूस मांडले जातात. ते दगड कायमस्वरूपी तेथेच राहत नाहीत. परिणामी फक्त दिखावाच केला जात असल्याची चर्चा परिसरात आहे.
नांदोशी पूल उठला जिवावर!
By admin | Published: September 02, 2015 9:49 PM