सातारा : ‘अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना साथ देणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा बैठक आयोजित केली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. महागाव येथील वाळू चोरीप्रकरणी जिल्हाधिकारी मुदगल यांनी बुधवारी रात्री धाड टाकून मुद्देमाल जप्त होता. या धाडसी कारवाईबाबत विभागीय आयुक्तांनी कौतुकोदगार काढले. महसूल यंत्रणेने सर्व पर्याय वापरुन कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कारवाईत कुचराई करणाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिला. चोक्कलिंगम म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे. शासकीय लिलावात वाळू ठेकेदारांनी भाग घ्यावा. रितसर बोली बोलावी, शासनाला महसूल भरावा. नियमाप्रमाणे व्यवसाय करावा. वाळू चोरीसारखे प्रकार करू नयेत. वाळू चोरी करणाऱ्यांवर शासकीय यंत्रणेनेही चोख कारवाई करणे आवश्यक आहे. सर्वांनी हातात हात घालून काम करावे. वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करताना पूर्णपणे पोलीस संरक्षण दिले जाईल. कुणालाही भिण्याची गरज नाही. कोणी वाळू माफियांना सहकार्य करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’ (प्रतिनिधी)
वाळूमाफियांना साथ देणाऱ्यांची गय नाही
By admin | Published: July 09, 2015 10:50 PM