राजीव मुळ्ये - सातारा -नि:शब्द कांदाटी खोरं लाँचच्या बुडबूड आवाजानं जागं झालेलं. तशी जाग या खोऱ्याला रोजच येते; पण यावेळी लाँचचा आवाज ईशान्येच्या वाऱ्याची झुळूक घेऊन आलेला. स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना जर ईशान्येकडील राज्यांमध्ये, घनदाट जंगलातल्या गावांत यशस्वी होऊ शकते, तर आमच्या पश्चिम घाटात का नाही..? विशिष्ट निग्रह करूनच सरकारी आणि बिगरसरकारी प्रतिनिधी पोहोचले मोरणी गावात...बामणोली विभागाचे वनक्षेत्रपाल (वन्यजीव) ए. एस. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पवार, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता डी. जे. जाधव, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, ‘ड्रोंगो’चे सुधीर सुकाळे, सागर गायकवाड आणि कोल्हापूरच्या आयुर्वेद-वनौषधी अभ्यासक अश्विनी माळकर... मोरणीच्या वाघजाई-महाकाली मंदिरात जमलेल्या गावकऱ्यांनी मीटिंंगसाठी मोरणीसह म्हाळुंगे आणि आरव ग्रामस्थांना खास शैलीत ‘बिनतारी वर्दी’ दिली. मंडळी जमेपर्यंत अनौपचारिक गप्पांमधून प्रतिनिधींनी गावकऱ्यांची स्थिती जाणून घेतली.कोयना धरण झाल्यानंतर गावातली ३०-४० घरं ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित झाली आणि सुमारे १५ घरं राहिली. नंतर वाढून ती २० झाली. ८० ते ९० लोकसंख्या असलेल्या या गावात हिंंदू-मराठा समाजाची घरं अधिक. धनगर-गवळी समाजाचं एखाद्-दुसरं घर. भात, वरी, नाचणीची पिकं आधी रानडुकरं खातात. उरलेलं धान्य ९-१० महिने पुरतं. मग तापोळा किंंवा बामणोलीला मजुरीला जायचं. शंभर रुपये हजेरी. संध्याकाळी बाजार घेऊनच घरी यायचं. घरटी एक-दोन तरुण मुंबईत. आपापला संसार सांभाळून जमेल तितकी मदत करतात. गावात कुणी आजारी पडलं तर थेट खेडला (जि. रत्नागिरी) न्यावं लागतं. खेडहून अवघड रघुवीर घाट चढून शिंंदी-आरवपर्यंत एसटी येते. तिथपर्यंत पायीच!शेतीव्यतिरिक्त हिरडा, वावडिंंग, आवळा, आपट्याची झाडं गावकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक उत्पन्न देतात. आवळ्यावर मिठाचं पाणी टाकून ‘उसरी’ बनवली जाते. पॅकिंंग करून ती खेडच्या व्यापाऱ्याकडे नेऊन द्यायची. तो ५० रुपये किलोनं विकत घेतो आणि १०० रुपये पावशेर दरानं विकतो. बायाबापड्या बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू तयार करतात; पण बाजारात घेऊन जायला दळणवळणाची व्यवस्था नाही. आकार बदलून बांबूच्या शोभेच्या वस्तू तयार करण्याची तयारी; पण पुन्हा प्रश्न तोच! बाजारपेठेत कोण नेणार? हमीभाव मिळणार का? कल्पना भरपूर. कष्टाची तयारी; पण वर्षानुवर्षे झळा सोसल्यामुळं कष्टाचा दाम खिशात पडेल याची शाश्वती उरलेली नाही. या स्थितीत ‘वन-जन जोडो’ अभियानातल्या सरकारी आणि बिगरसरकारी प्रतिनिधींनी काम सुरू केलंय. गावकऱ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन, त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन, अडचणी सोडवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांचीच मतं घेऊन या प्रतिनिधींनी ‘वनग्राम’ची संकल्पना मांडली आणि गावकऱ्यांनी ती उचलून धरली. हूऽऽऽऽऽ ‘ओव्हर अँड आउट’अँड्रॉइड मोबाइल घेऊन फिरणाऱ्यांना वाटतं, आपण सुधारलो. असेलही! पण एक दिवस नेटवर्क नसलेल्या भागात फिरलं की समजतं, प्रगती तंत्रज्ञानाची झाली; माणसाची नाही. कोणत्याही तंत्राशिवाय आपलं नेटवर्क तयार करू शकतो, तोच ‘माणूस.’ वाघजाईच्या मंदिरातून मीटिंंगसाठी पुकारा करणाऱ्याचं बिनतारी संदेशवहन पाहून याची खात्री पटली. ‘हूऽऽऽऽऽ’ असा पुकारा केला की त्याचा अर्थ ‘हॅलो.’ मग पलीकडून... सुमारे दोन किलोमीटरवरून तसाच पुकारा होतो. मग ज्याला संदेश द्यायचा, त्याचं नाव घेऊन ‘हूऽऽऽ’ केलं जातं. तिकडून संबंधित व्यक्ती जबाब देते. मग इकडून निरोप सांगायचा. मग दोन वेळा ‘हूऽऽऽऽऽ’ करायचं. याचा अर्थ ‘ओव्हर अँड आउट...’ म्हणजे, संदेश पोचला; संभाषण संपलं! आहे ना विलक्षण बिनतारी यंत्रणा!!
ईशान्येच्या वाऱ्याची झुळूक पश्चिमेला!
By admin | Published: October 27, 2014 9:49 PM